– सभापती-उपसभापतींसह सदस्यांचा पत्र परीषदेतून आरोप
गोंदिया, ३० जानेवारी-गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने स्थानिक पंचायत समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या दुकान गाळे वाटपात जिल्हा परीषद पदाधिकार्यांनी स्थानिक बेरोजगारांना डावलत मर्जीतील लोकांना गाळे वाटप केल्याचा आरोप येथील पंचायत समिती सभापती, उपसभापतींसह सर्व सदस्यांनी पत्रकार परीषदेतून केला आहे. तर प्रति गाळे ३० ते ४० लाख रुपयांची वसूली करून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोपही पंचायत समितीच्या पदाधिकार्यांनी केला आहे.
पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले यांच्या कक्षात शुक्रवार ३० जानेवारी रोजी पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासह उपसभापती शिवलाल जामरे, माजी उपसभापती निरज उपवंशी, पं.स. सदस्य शैलजा सोनवाने, मीनाक्षी बारलिंगे, कणिराम तावाडे, विद्याकला पटले, राहुल मेश्राम, मंजु डोंगरे, वंदना पटले, अजाबराव रिनाईत, हिरामण दहाट यांच्यासह पंचायत समितीचे सर्व २८ सदस्य उपस्थित होते. प्रसंगी सभापती रहांगडाले यांनी सांगितले की, तालुकास्तरावरील ग्रामीण भागातील बेरोजगार, महिला बचत गटातील महिला, दिव्यांगांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा निधी अंतर्गत येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात ८ व महिला बालकल्याण विभाग कार्यालयाच्या आवारात ३ असे ११ दुकान गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. जि. प. कडून सदर दुकान गाळे लिलाव प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक होते. परंतु जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख पदाधिकार्यांनी संगनमत करून गाळे वाटपाची माहिती नागरिकांना होऊ नये यासाठी सदर पोर्टलच हॅक केल्याचा आरोप पदाधिकार्यांनी केला आहे. त्यात मर्जीतील व्यक्तींना गाळे वाटप करून त्यांच्याकडून प्रत्येकी एका गाळ्याचे ३० ते ४० लाख रुपये वसूल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तेव्हा सदर गाळे वाटप प्रक्रिया रद्द करावी व पुन्हा पारदर्शक पद्धतीने दुकान गाळ्यांचे वाटप करावे. अशी मागणी पं.स. सभापती-उपसभापतींसह सर्व सदस्यांनी केली आहे.
अन्यथा सामुहिक राजीनामे…
दुकानगाळे वाटप प्रक्रीया पारदर्शक पद्धतीने करावी, येत्या मासिक बैठकीपर्यंत यावर तोडगा काढावा. अन्यथा पं. स. सभापती-उपसभापतींसह सर्व सदस्य आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे देणार असा इशाराही सर्व पदाधिकार्यांनी दिला.





