शासनाची तातडीने मदत; वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने खबरदारी घेण्याचे आमदारांचे आवाहन
अर्जुनी-मोर. :तालुक्यातील मौजा वडेगाव बंद्या येथील वाघाच्या दुर्दैवी हल्ल्यात प्राण गमावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना शासनाकडून मंजूर झालेली १० लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते हा मदतीचा धनादेश पीडित कुटुंबाला प्रदान करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, १० मे २०२६ रोजी वडेगाव बंद्या येथील रहिवासी सौ. शोभा हरिदास रहाटे यांचा जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असताना वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून शासनाकडून पीडित कुटुंबासाठी तत्काळ १० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली होती.त्या अनुषंगाने २५ जुलै २०२६ रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात मंजूर झालेला १०,००,००० रुपये (अक्षरी दहा लाख रुपये) रकमेचा धनादेश मृत महिलेचे पती हरिदास रहाटे यांच्याकडे आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सोपवण्यात आला.
🤝 शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठाम: आमदार राजकुमार बडोले
याप्रसंगी बोलताना आमदार राजकुमार बडोले यांनी रहाटे कुटुंबीयांचे सांत्वन केले. “ही घटना अतिशय वेदनादायी असून शासन या कठीण प्रसंगात पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या अथवा बाधित झालेल्या कुटुंबांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असे ते म्हणाले.तसेच, जंगलालगतच्या भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करून अशा दुर्घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी वन विभागाने योग्य उपाययोजना व खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
👥 अधिकारी व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
धनादेश वितरणाच्या या कार्यक्रमाला गोठणगावचे वनपरिक्षेत्राधिकारी मिलिंद पवार, वन विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच वडेगाव बंद्या व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





