31.8 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ लाखांदूर येथे दोन दिवसीय रौप्य महोत्सवी राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन थाटात

लाखांदूर येथे दोन दिवसीय रौप्य महोत्सवी राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन थाटात

0
36

लाखांदूर :- बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूर व नागवंश बहुउद्देशीय संस्था, नागपूर कडून 77 व्या राष्ट्रीय मतदार दिवशी व प्रजासत्ताक दिवशी 25 व 26 जानेवारी 2026 रविवार व सोमवारला आयोजित केलेले ” दोन दिवसीय रौप्य महोत्सवी राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन ”आशीर्वाद मंगल कार्यालय, लाखांदूर, जिल्हा भंडारा येथे थाटात व शांततेत संपन्न झाले.

दि.25 तारखेला पाहुण्यांनी महापुरुषांच्या छायाचित्राला गुलाब पुष्प अर्पून अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करून आपला आदरभाव व्यक्त केला. मान. डॉ. अनिता साबळे,असि. प्रोफेसर, सिंबायसिस लाॅ कॉलेज, नागपूर यांनी भारताच्या संविधानाची उद्देशिका व मूलभूत कर्तव्य यांचे वाचन करून संमेलनाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन झाल्याचे घोषित केले. मान. विनोद ठाकरे, नगराध्यक्ष, नगरपंचायत लाखांदूर यांनी पाहुण्यांचे स्वागत करताना हे संविधान साहित्य संमेलन लाखांदूरचे भूषण असल्याचे सांगितले.

” लोकशाहीमध्ये जनप्रतिनिधी, बुद्धिजीवी व मतदारांची भूमिका ” ( Role Of People’s Representatives, Intellectuals And Voters In Democracy ) या विषयावर अध्यक्षीय भाषण करतांना मान. जावेद पाशा कुरैशी, नागपूर, सुप्रसिद्ध सामाजिक विचारवंत, लेखक व कवी म्हणालेत की ” ज्यांच्यासाठी संविधान तयार करण्यात आले तेच लोक अनभिज्ञ असून देशातील मुठभर बुद्धीजीवी तसेच राजकीय लोकांनी संविधानाचा वापर करून आपले हित साधले. म्हणून बहुसंख्याक वंचितांनी जाणीवपूर्वक संविधानाचा अभ्यास करून आपल्या हक्कासाठी व कल्याणासाठी वेगवेगळ्या लढा न देता संघटितपणे लढावे.

यावेळी डॉ. अनिता साबळे, नागपूर यांनी सांगितले की, “लोकप्रतिनिधींनी जनतेचा आवाज बनून जनतेचे प्रश्न सोडवायला हवेत.”डॉ रेखा बारहाते, अधिवक्ता, जिल्हा न्यायालय, नागपूर, म्हणाल्यात की,” बुद्धिवादींनी समाजाला योग्य मार्गदर्शन करावे व मतदारांनी निवडणुकीच्या वेळी घरी न राहता आपला मतदाराचा हक्क बजावला तरच लोकशाही बळकट होईल “.यावेळी श्रीराम कांबळे गुरुजी व जोहराबाई कांबळे, नागपूर हे विशेषत्वाने उपस्थित होते.संमेलनाबद्दल व आयोजकाबद्दल बोलताना जोहराबाई कांबळे म्हणाल्यात की,” संविधानाने हक्क दिल्यामुळेच स्त्रिया पुरुषांच्या बरोबरच विविध क्षेत्रात शकतात. संमेलनाचे आयोजक अनिल काणेकर यांचे बद्दल बोलताना “मूर्ती छीटी पण कीर्ती मोठी” असे सांगून त्यांच्या अथक मेहनतीनेच आजचे हे दोन दिवसीय रौप्य महोत्सवी राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन होत असल्याचे सांगितले.”

यावेळी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे डॉ. एल जे कान्हेकर, इसापूर,से.नि. संयुक्त निदेशक, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूर येथे प्राध्यापक असलेले भोजराज बोदेले,(मराठी), शैलेश भगत ( रसायनशास्त्र), ज्ञानेश्वर लांजेवार, (वनस्पतीशास्त्र), प्रणय वासनिक (भौतिकशास्त्र), सुमित रोकडे (भौतिकशास्त्र), विष्णू जाधव (सूक्ष्मजीवशास्त्र), आणि दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, तह- वैजापूर जिल्हा छ.संभाजी नगर येथेअसि.प्रोफेसर असलेली लाखांदूर येथील प्रज्ञा वसंत उके (कृषी सूक्ष्मजीवशास्त्र) या सगळ्यांनी 2025 मध्ये Ph.D. ही उच्च पदवी प्राप्त केल्याबद्दल तसेच इतरांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व संमेलन आयोजनात मदत करणाऱ्या लाखांदूर येथील जयेंद्र सुखदेवे, हिवराज तरोणे, सचिन खरकाटे, गजानन भावे,कळवू राखोंडे, नंदकिशोर वांढरे, घनशाम ठाकरे, देवानंद दरवरे, बाबूभाऊ शेख, संजय नहाले, पुरुषोत्तम भागडकर, आणि नागपूर येथील महेंद्र राऊत,संजय ठाकरे व धर्मेंद्र म्हैसकर या सर्वांना गुलाबपुष्प, स्मृतिचिन्ह व “भारताचे संविधान” देवून सत्कार करण्यात आला.

संमेलनाचे आयोजक अनिल काणेकर, अध्यक्ष, बहुजन प्रबोधन मंच व नागवंश बहुउद्देशीय संस्था,नागपूर यांनी 26 जानेवारी 2002 पासून प्रत्येक वर्षी खंड न पडू देता संमेलन आयोजित करण्यामागची भूमिका प्रास्ताविकातून विशद केली.मान.अशोक भजने, नागपूर, संघटक, बहुजन विद्यार्थी संघ यांनी संचालन तर अमर प्रधान, लाखांदूर, कार्यकर्ता, बहुजन विद्यार्थी संघ यांनी आभार प्रदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात रात्री 8-00 वाजता मान‌. सत्यपाल महाराज शिरसोलीकर यांना संमेलनाचे आयोजक अनिल काणेकर यांनी गुलाब पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन तसेच संचातील सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कीर्तनातून महाराजांनी अंधश्रद्धा, शिक्षण, देशात बोकाडलेला भ्रष्टाचार, वाईट रूढी परंपरा, धार्मिक अवडंबर इत्यादी अनेक विषयावर मनोरंजनातून समाज प्रबोधन केले. संचालन स्वप्निल कोचे, नागपूर, संघटक, बहुजन विद्यार्थी संघ, यांनी केले.
यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या महिला पुरुषांनी व लहान थोरांनी कार्यक्रमाच्या लाभ घेतला.

blank