-तीन तासांचा थरार; नऊ अग्निशमन वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण
अमरावती-मालटेकडी परिसरातील जिल्हा परिषद क्वार्टर्सजवळ शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री सुमारे २.१० वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आगीचे लोळ दूरवरून दिसत होते. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिस ठाण्याने अग्निशमन दलाला तातडीची सूचना दिली.
अग्निशमन दलाचे पहिले वाहन घटनास्थळी दाखल होताच आगीचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. आग वेगाने पसरत असल्याने तात्काळ अतिरिक्त मदतीची मागणी करण्यात आली. त्यानंतर अग्निशमन मुख्यालय तसेच प्रशांतनगर उपकेंद्रातून सलग वाहने घटनास्थळी दाखल झाली. रात्रीची वेळ, अंधार आणि आगीचा वाढता वेग यामुळे बचावकार्य करताना अग्निशमन कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नऊ अग्निशमन वाहनांच्या मदतीने पहाटे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत जिल्हा परिषदेचे जुने सागाचे साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. तसेच एका कर्मचाऱ्याचे क्वार्टर्सही आगीत पूर्णतः जळाले. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे घटनास्थळी असलेला एक गॅस सिलिंडर वेळेत बाहेर काढण्यात आला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आगीचे रौद्र रूप पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा परिषद क्वार्टर्स अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने नेमके किती नुकसान झाले, याचा अंदाज अद्याप बांधता आलेला नाही. आगीचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





