25.4 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home Top News राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणूून सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ

राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणूून सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ

0
37

मुंबई,दि.३१ः अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत (Ajit Pawar Death Plane Crash) निधन झाल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हाॅलमध्ये पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.
त्यानुसार, शपथविधी सोहळा संध्याकाळी 5 वाजता पार पडला. मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. शपथविधी सोहळा अवघ्या 10 मिनिटांत अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
सुनेत्रा पवार यांचा परिचय
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Profile) यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) याठिकाणी झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेल्या सुनेत्रा पवार यांना राजकीय वारसा जन्मतःच लाभलेला होता. १९८५ मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्यासोबत झाला. लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे आल्यावर त्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली. काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. अगदी पहाटे पासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावालाच या अभियानात सहभागी केलं. त्यांच्या या प्रेरणेतून ग्रामस्वच्छता अभियानात काटेवाडी राज्यात प्रथम क्रमांकावर आलं. या कार्याची दखल घेत देश-विदेशातून अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कामामुळं सुनेत्रा पवार यांना सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याला सुरूवात झाली.

बारामतीमध्ये ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागृती आदी उपक्रम सुनेत्रा पवारांनी राबवले. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय आणि नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला.

blank