26.9 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ प्रतापगड येथील शिव मंदिरात सिकलसेल तपासणी शिबीर

प्रतापगड येथील शिव मंदिरात सिकलसेल तपासणी शिबीर

0
39

​गोंदिया (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या संकल्पनेतुन सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी राज्यातील 21 जिल्ह्यामध्ये दि.15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान‘ राबविण्यात येत आहे.जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथन यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांच्या प्रत्यक्ष कार्यवाहीत जिल्ह्यातील आरोग्य संस्थेमार्फत सिकलसेल आजाराबाबत तपासणी,निदान व उपचार,समुपदेशन व जनजागृती करण्यात येत आहे.

दि.30 जानेवारी रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र प्रतापगड येथील शिव मंदिरात सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान‘ राबविण्यात आले.या अभियानांतर्गत सिकलसेल सोल्युबिलीटी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना सिकलसेलसारख्या गंभीर आजाराबद्दल माहिती व्हावी आणि बाधितांना वेळेवर उपचार मिळावेतया उद्देशाने हे शिबीर घेण्यात आले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य पथकाने विशेष परिश्रम घेतले.​आरोग्य सेवक सैय्यद यांनी सिकलसेल आजाराची लक्षणे आणि घ्यावयाची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. आरोग्य सेविका कोमल पडोळे व अर्चना मेंढे, महालँबचे फ्लेबोटोमिस्ट नेहा कापगते यांनी महिला आणि लहान मुलांच्या आरोग्याबाबत समुपदेशन करत रक्त तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली.​आशा सेविका पौर्णिमा वालदे यांनी दुर्गम भागातील ग्रामस्थांना शिबिराची माहिती देऊन त्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

सिकलसेल शिबीराप्रसंगी प्रतापगड गावचे सरपंच भोजराम लोगडे, उपसरपंच उमेश मडावी, ग्राम पंचायत सदस्य रेवता गहाणे यांनी गावातील लोकांना जास्तीत जास्त संख्येने सिकलसेल संबधाने रक्त तपासणी करण्याचे आवाहन यावेळी केले. यावेळी ग्रामसेवक नरेंद्र गोमासे व मनोज डोंगरवार,आरोग्य सहाय्यक सुरेश पारधी, अंगणवाडी सेविका वैशाली लोगडे व तेजस्विनी जनबंधु उपस्थित होते. सिकलसेल आजार अनुवांशिक असुन या २२ दिवसांच्या मोहिमेत जास्तीत जास्त 0 ते 40 वयोगटातील नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी. रक्ताच्या नात्यात लग्न टाळणे आणि विवाहापूर्वी सिकलसेल कुंडली जुळवणे ही या आजाराला रोखण्याची गुरुकिल्ली  आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना सिकलसेल कार्डचे महत्त्व आणि शासन देत असलेल्या सोयीसुविधांची माहिती देण्यात आली.

blank