
पांजरा येथे स्मार्ट ग्राम संसद भवनाचे लोकार्पण
तिरोडा-तालुक्यातील पांजरा येथील स्मार्ट ग्राम संसद भवनाचे लोकार्पण तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना आमदार विजय रहांगडाले म्हणाले की पांजरा गावाप्रमाणे मला माझ्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव स्मार्ट करण्यासाठी सरपंचांना प्रोत्साहित करुन ग्राम सुजलाम् सुफलाम कसे करता येईल त्यासाठी प्रयत्न केले जातील.पांजरा गावातील विकास माजी सरपंच राजेंद्र मार्कंड चामट यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने होत आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.या गावातील नागरिकांनी मागील ३० वर्षांपासून ग्राम स्वच्छता अभियानाचे व्रत अत्यंत जबाबदारीने पार पाडत आहे. ही खरंच देशसेवाच आहे असे मला वाटते व स्मार्ट ग्रामपंचायत संसद भवन निर्मिती मुळे गावातील नागरिकांना मोठा फायदा होईल आणि यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नाही अशा भावनिक शब्दांत प्रतिपादन केले. या कार्यक्रमा प्रसंगी पंचायत समितीचे सभापती तेजराम चव्हाण,जिल्हा परिषद सभापती रजनी कुंभारे,गट विकास अधिकारी संघमित्रा कोल्हे,पंचायत समिती सदस्या प्रमिला भलावी,सरपंच सौ.शारदा चामट ,उपसरपंच सुभाष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य महेश गाढवे,अमोल चामट,सुषमा उकेबोंदरे,निरंजना उपासे, शालिनी गोमासे,वर्षा अस्वले,माजी सरपंच राजेंद्र चामट उपस्थित होते, याप्रसंगी पांजरा गावातील पिण्याच्या पाण्याचे आर ओ,अभ्यासिका केंद्र,ओपन जिम चे उद्घाटन करण्यात आले त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले, यावेळी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध मनमोहक कलाकौशल्य व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच राजेंद्र मार्कंड चामट यांनी केले तर आभारप्रदर्शन दत्ता हडबे यांनी केले.





