आमदार राजकुमार बडोले यांनी समाजएकतेचा दिला संदेश
अर्जुनी-मोर.—नवेगाव बांध येथे श्री संत नरहरी सोनार महाराज समाज भवनाच्या आवारभिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थिती दर्शवून समाजबांधवांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी आमदार बडोले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संत नरहरी सोनार महाराज हे वारकरी संप्रदायातील महान संत असून त्यांनी समाजाला भक्ती, प्रामाणिकपणा आणि एकतेचा मार्ग दाखविला आहे. त्यांच्या विचारांवर चालत समाजाने संघटित राहणे अत्यंत आवश्यक आहे. समाज भवनाच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील प्रत्येक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. सोनार समाजाच्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत होईल आणि युवा पिढीला सकारात्मक दिशा मिळेल. या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
भूमिपूजन सोहळ्यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण होते. समाज भवनाच्या आवारभिंतीच्या बांधकामामुळे परिसराच्या सुरक्षिततेसह सुविधांमध्ये भर पडणार आहे.
या कार्यक्रमाला होमराज पुस्तोडे (माजी उपसभापती, पं.स.), संजय खरवडे (माजी सरपंच, कान्होली), लोकपाल गहाणे (संचालक, कृ.उ.बा.स.), मुलचंद गुप्ता (अध्यक्ष, तं.मु. नवेगाव बांध), अमृत यावलकर, पवारजी, महादेव बोरकर, रेवचंद शहारे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी संत नरहरी सोनार महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करत समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.





