24.8 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या संपुर्ण विकासासाठी सर्व सोई सुविधायुक्त शाळेची गरज-जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर

विद्यार्थ्यांच्या संपुर्ण विकासासाठी सर्व सोई सुविधायुक्त शाळेची गरज-जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर

0
109

वडेगाव येथे भव्य शालेय इमारत, अत्याधुनिक लॅब व बहुउद्देशीय रंगमंचाचे लोकार्पण

तिरोडा,दि.०७: जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, वडेगाव येथे नवनिर्मित भव्य शालेय इमारत, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज फ्युचरीस्टीक प्रयोगशाळा तसेच बहुउद्देशीय रंगमंच यांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले. या लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी भूषविले.
या प्रसंगी अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शिक्षण देणे पुरेसे नसून, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे अत्यंत गरजेचे आहे. शैक्षणिक प्रगतीचा पाया मजबूत करण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच अद्ययावत सुविधा मिळाल्या पाहिजेत, हाच जिल्हा परिषदेचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवनिर्मित भव्य शालेय इमारत ही केवळ इमारत नसून, ती विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी आहे. अत्याधुनिक व फ्युचरीस्टीक प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल, प्रयोगशीलता वाढेल तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले. डिजिटल युगात प्रयोगाधारित शिक्षणाला अधिक महत्त्व असून, अशा सुविधा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यास उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी सांगितले.
बहुउद्देशीय रंगमंचाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, नेतृत्वगुण व व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो. या रंगमंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल आणि त्यांचे कौशल्य समाजासमोर सादर करण्याची संधी प्राप्त होईल.शिक्षकवर्गाने या आधुनिक सुविधांचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, तर पालकांनीही आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद शिक्षणाच्या दर्जात सातत्याने सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही अशा विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेष हर्षे, माजी अध्यक्ष व जि. प. सदस्य पंकज रहांगडाले, समाजकल्याण सभापती रजनीताई कुंभरे, पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण, जि. प. सदस्य तुमेश्वरी बघेले, पं. स. सदस्य दिपाली टेंभेकर, सरपंच शामराव बिसेन, माजी सभापती निता रहांगडाले, माजी जि. प. सदस्य सुनिता मडावी, पं. स. सदस्य यमु नंदेश्वर मात्री, सरपंच कल्पना दहिकर (चोरखमारा), सरपंच ज्योती देशमुख, उपसरपंच दिलेश्वरी गौत्तम, माजी जि. प. सदस्य संभाजी ठाकरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.
तसेच बाळकृष्ण सोनवाने, राजकुमार परले, गुड्डुभाऊ ठाकरे, मुन्ना सोनवाने, चौलेजी, भरत गुरव, निलकंठ बिसेन, चव्हाण (गटशिक्षणाधिकारी), शामरावजी, राजकुमार पटले, भोजराज पटले, केशर रहांगडाले, राठोड ताई, बावनकर ताई, रंजुताई अंबुले, कल्पना अंबुले, शिला ठाकरे, नंदेश्वरताई, सोनवणे ताई, सावित्री अंबुले, वामन धपाडे, मधु भेलावे, अशोक नंदेश्वर, सुधीर मेश्राम आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास आनंदराव गौतम (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), निळुभाऊ बेनार, एम. आर. ठाकरे (केंद्रप्रमुख), अंकुष राठोड, सेवक अंबुले, एस. पी. ठाकरे (प्राचार्य), कुंदा बावनथळे (मुख्याध्यापक), रजनी बिंदारे यांच्यासह शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम उत्साही व सकारात्मक वातावरणात पार पडला. नव्या सुविधांमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भवितव्याची दारे खुली होतील, असा आशावाद यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

blank