तिरोडा,दि.१०- सेजगाव सार्वजनिक वाचनालय, सेजगाव यांच्या वतीने युवक-युक्तींमध्ये आरोग्य, शिस्त व क्रीडावृत्ती वाढीस लागावी या उद्देशाने जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन ८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या स्पर्धेला परिसरातील नागरिक, युवक-युवती व धावपटूंनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य पवन पटले हे होते.
सरपंच सौ. उषाताई कठाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन व सहउद्घाटन पं. स. सदस्य सौ. ज्योतीताई शरणागत यांच्या हस्ते पार पडले. दीपप्रज्वलन डॉ. किशोर पारधी यांच्या हस्ते करण्यात आले तर क्रीडांगण पूजन विजय खेमलालजी पारधी (माजी सैनिक) यांच्या हस्ते पार पडले.
पुरुष गट (८ कि. मी.) मध्ये निखार भालावी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. लिलाराम बावणे यांनी द्वितीय तर रोहित पाटले यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्त्री गट (३ कि. मी.) मध्ये प्राची बोंद्रे यांनी प्रथम क्रमांक, प्रिया चनाब यांनी द्वितीय तर एकोडी येथील सुषमा हरिणखेडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेच्या शेवटी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. विजय खेमलाल पारधी, संजय खेमलाल पारधी, संजय शिवलाल पारधी, तसेच श्रेयांश सोलार, तिरोडा व डिजिटल कॉम्प्युटर, एकोडी यांच्या तर्फ विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात नव निर्वाचित सैनिक, शासकीय सेवेत रुजू झालेले तसेच सेवानिवृत्त अशा एकूण १५ मान्यवरांचा सत्कार टॅलेंट हंट कोचिंग क्लास, एकोडी यांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून सतीश पारधी, प्रा. डॉ. विनोद गेडाम, पी. एस. चाफले व संजय पारधी व विजय पारधी यांनी फिटनेस मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील महाजन यांनी केले. प्रस्तावना अभिषेक कठाने यांनी मांडली तर आभार अमन गोटे यांनी मानले.





