गोंदिया, दि.10 : सायबर गुन्ह्याच्या वाढत्या धोक्याचा परिणाम दैनिक जीवनावर येऊन ठेपला आहे, यासाठी सायबर जागरूकता होणे फार महत्त्वाचे असल्यानेच आजचा सुरक्षित आंतरजाल दिवस म्हणजेच ‘सेफ इंटरनेट डे’ साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सेफ इंटरनेट डे साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते, याप्रसंगी उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, सायबर सेलचे पोलीस उपनिरिक्षक राजेश शेंद्रे, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे मनोज बल्लाळ, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अभिनय बोरतरकर, महसुल अधिक्षक धनंजय देशमुख मंचावर उपस्थित होते.
श्री. मुल्ला पुढे म्हणाले, मोबाईलच्या अतीवापरामुळे वाढत्या शारीरिक, मानसिक, आर्थिक दुष्परिणाम वाढत आहेत. बऱ्याचदा आपणच इनपुट्स देतो, त्या माहितीतून सायबर क्राईम वाढत चाललेले आहे. मोबाईल वापरताना काळजीपूर्वक वापरावा. लहान बालकांच्या हाती मोबाईल देऊ नये, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक घरातून सायबर गुन्हा होणार नाही यासंदर्भाच्या सुरक्षिततेची जबाबदारी घरच्या प्रमुखांनी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
साधा मोबाईल ते टू जी, थ्री जी आणि आता फाइव जी पर्यंतचा प्रवास आपण पाहिलेला आहे. यात झालेला बदल आणि अद्यावत झालेले तंत्रज्ञान त्यामुळे सोय झाली तर कुठे कुठे डिजिटल गुन्हे वाढत चाललेले आहे. याबाबत काही सिनेमा तसेच वेब सिरीज मधून जागरूकता पसरवली जात आहे, त्या देखील आपण सर्वांनी बघायला हव्यात असे श्रीमती पाटील यांनी सांगितले.
भीती आणि लोभ हे सायबर गुन्ह्याचे मुख्य कारणे : पोलीस निरीक्षक शेंद्रे
भीती आणि लोभ हे सायबर गुन्ह्याचे मुख्य कारणे असल्याची माहिती सायबर पोलीस निरीक्षक श्री. शेंद्रे यांनी सांगितले. ऑडिओ व्हिडिओ आणि मेसेज या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे होत असतात. या गुन्ह्यांना शिक्षित वर्गही मोठ्या प्रमाणात बळी पळत असल्याचे संशोधन आहे.
सायबर गुन्ह्यात अडकल्यानंतर घडलेल्या घटनेच्या तासाभरातच (गोल्डन आर) मध्ये गुन्हा दाखल झाला तर सायबर गुन्ह्या अंतर्गत झालेली फसवणूक टाळता येते. सायबर गुन्हा झाल्यास 1390 या क्रमांकावर फोन करून गुन्हा लगेच नोंदवावा.
एपीके फाईल या फसवणुकीच्या फाइल्स असतात. मोबाईलवर सारखे जाहिरातीचे मेसेजच्या माध्यमातून ते येत असतात. एकदा अशा लिंकवर क्लिक केले तर आपण सायबर गुन्ह्यात ओळखतो. त्यामुळे अशा फाईल्सवर क्लिक करणे टाळायचे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
कुठल्याही भूलथापांना बळी पळून शिघ्र श्रीमंत होण्याचा मार्ग टाळण्यातच भलाई असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आजच्या काळात सायबर गुन्हेगार हे स्लीपर सेल्स म्हणून काम करतात. त्यामुळे अतिशय जागरूकपणे सोशल मीडिया व अन्य माध्यमे वापरणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. गुन्हेगार हा प्रादेशिक भाषेत बोलत नसून तो हिंदी अथवा इंग्रजी भाषा जाणतो, अशावेळी त्याच्याशी मातृभाषेतून बोलून सायबर गुन्हा टाळता येतो असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.
आजच्या युगात सायबर गुन्ह्यापासून बचाव करणे मोठे आव्हान आहे : प्राध्यापक बल्लाळ
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, त्यामुळे सायबर गुन्ह्यापासून बचाव करणे हे मोठे आवाहन असल्याचे प्राध्यापक बल्लाळ यांनी सांगितले. त्यांनी ट्रू कॉलर हे ॲप मोबाईल वरून काढून टाकण्यास सांगितले, कारण या ॲपच्या माध्यमातून आपण आपली सर्वच माहिती देत असल्याचे निदर्शनास आले. क्रोम आणि व्हाट्सअपमधल्या काही सेटिंग्स बदलून माहिती प्रधानापासून बचाव होऊ शकतो असे सांगितले. आज मोबाईलच्या माध्यमातून मिळालेली माहिती विकून आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलेली आहे. त्यामुळे ॲप वापरताना केवळ त्यात साठीच्या परवानगीवर क्लिक करावे अशी माहिती दिली. पासवर्ड ठेवताना हाय पण स्पेशल कॅरेक्टर्स असावे याची दक्षता घ्यावी आणि रियल टाईम ओटीपी तसेच टू वे ऑथेंटीफिकेशन असावे असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एन.आय.सी.चे नेटवर्क अभियंता किशोर बगमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रकल्प अधिकारी हरिचंद्र पौनिकर, एन.आय.सी. चे अभियंता भानू हरिणखेडे यांनी प्रयत्न केले.





