राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाला असून, या बातमीने राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. रेवती सुळे यांचा विवाह सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नियोजित विवाह सोहळ्याची चर्चा सुरु होताच, सुळे कुटुंबाचे होणारे जावई सारंग लखानी नक्की कोण आहेत आणि त्यांचे कार्यक्षेत्र काय आहे, याबद्दल सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोण आहेत सारंग लखानी? सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग लखानी हे एक यशस्वी उद्योजक असून त्यांची ओळख केवळ एका उद्योगपतींचे पुत्र एवढीच मर्यादित नाही. सारंग हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत या नियोजित विवाहाची माहिती दिली आहे. या पोस्टनंतर सुळे आणि लखानी कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तरी विवाह सोहळ्याची तारीख आणि स्थळाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सारंग यांची व्यावसायिक आणि क्रीडा कारकीर्द सारंग लखानी हे मुंबईचे रहिवासी असून त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. उपलब्ध माहितीनुसार आणि त्यांच्या ‘लिंक्डइन’ प्रोफाईलनुसार, सारंग हे गेल्या आठ वर्षांपासून विश्वराज ग्रुपमध्ये ‘कार्यकारी संचालक’ (Executive Director) म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. या समूहामध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी ‘मॉडर्न हायड्रोजन’ या कंपनीमध्ये ‘व्यवसाय विकास सल्लागार’ म्हणूनही काम पाहिले आहे. व्यवसायाव्यतिरिक्त सारंग यांना क्रीडा क्षेत्राचीही विशेष आवड आहे. ते एक उत्तम बॅडमिंटनपटू असून त्यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या (BWF) नोंदीनुसार, त्यांचा जन्म २३ जुलै १९९२ रोजी झाला आहे.
विश्वराज ग्रुपचे कार्यक्षेत्र सारंग लखानी ज्या समूहाचे नेतृत्व करत आहेत, तो विश्वराज ग्रुप पाणी व्यवस्थापन क्षेत्रात देशातील एक आघाडीचा समूह मानला जातो. कंपनीच्या अधिकृत माहितीनुसार, हा ग्रुप भारतातील पाणीपुरवठा (Water Utility) आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांच्या विकासामध्ये अग्रगण्य आहे. विशेषतः औद्योगिक वापरासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर करण्यावर या कंपनीचा मुख्य भर आहे. विश्वराज ग्रुप हा ‘ईएसजी’ (ESG) तत्त्वांवर आधारित असून पाण्याची शाश्वतता, सांडपाणी प्रक्रिया आणि पाण्याचा पुनर्वापर या गोष्टींसाठी वचनबद्ध असलेला सामाजिक उपक्रम म्हणून ओळखला जातो.
रेवती सुळे यांचे शिक्षण आणि सक्रियता सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांनीही उच्च शिक्षण परदेशातून पूर्ण केले आहे. त्यांनी लंडन येथील प्रतिष्ठित ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून आपली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. शिक्षणासोबतच त्या सामाजिक आणि राजकीय कार्यातही रस घेताना दिसल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान रेवती यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात आपली आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. या काळात त्यांनी त्यांचे चुलत भाऊ आणि श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांच्यासोबत बारामती शहरात विविध ठिकाणी रोड शो आणि प्रचार फेऱ्यांमध्ये हजेरी लावली होती.





