
नवी दिल्ली– संसद परिसरात शेतकऱ्यांसाठीच्या न्याय हक्काकरीता सुरु असलेल्या आंदोलनात लोकसभा विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी,खासदार बळवंत वानखडे,खासदार डाॅ.प्रशांत पडोळे,खासदार प्रतिभा धानोरकर,वर्षा गायकवाड,अमर काळेसह इतर खासदार सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत केलेल्या नव्या व्यापार करारामुळे आपल्या बळीराजाच्या भविष्यावर टांगती तलवार आली आहे. याच्याच निषेधार्थ आज संसद परिसरामध्ये इतर सहकाऱ्यांसमवेत मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला. मोदी सरकारने स्वार्थासाठी अविचारी निर्णय घेऊन भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचा बळी दिल्याचा आरोप खासदारांनी केला आहे.
बाहेरच्या देशांमधून मोठ्या प्रमाणात शेतीमाल, कमी किंमतीत आपल्या देशात आयात केला तर यामध्ये आपल्या देशातील शेतकऱ्यांचा मोठा तोटा होणार आहे, ही बाब सरकारच्या लक्षात का येऊ नये. सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या अहिताचा विचार करत आहे. मोदी सरकारची आधीची धोरणे तर शेतकरी विरोधी होतीच, पण आता या कराराने कृषी अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्याचे काम केल्याचा आरोप खासदार डाॅ.पडोळे यांनी केला आहे.





