33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ राज्य महिला आयोगाच्या  जनसुनावणीत 66 तक्रारी 

राज्य महिला आयोगाच्या  जनसुनावणीत 66 तक्रारी 

0
41

blank

– राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर

* एकूण 58 तक्रारींवर कार्यवाही

भंडारा, दि.17 : भंडारा जिल्ह्यात आज पार पडलेल्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत  आज 66 तक्रारीची जनसुनावणी यशस्वी ठरली असून एकूण 58  तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली.

राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत महिलांच्या समस्या व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील  नियोजन विभागाच्या सभागृहात जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे,  जिल्हाधिकारी सावनकुमार , पोलीस अधीक्षक नुरूल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरुण बांदुरकर,सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,मिलींद बुराडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री.जोल्हे, नितीन मोहुरले यांच्यासह समुपदेशक, तक्रारदार, पॅनलमध्ये समाविष्ट विधीतज्ञ, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

 या जनसुनावणी कार्यक्रमात महिला आयोगाची भूमिका मांडताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या, कायदा, सुरक्षा व प्रशासन हे प्रत्येक नागरिकांसाठी आहे. कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्वाची असून ‘महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत तसेच प्रलंबित असलेल्या महिलांच्या तक्रारींना न्याय मिळत आहे. महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आज पार पडलेल्या  जनसुनावणीदरम्यान एकूण 66 तक्रारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदवण्यात आल्या, ज्यामध्ये कौटुंबिक  तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 52 इतके  होते. समुपदेशकांच्या मदतीने समुपदेशन करण्यात आले, त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये सलोखा राखण्याचा प्रयत्न आयोगाच्या वतीने करण्यात आला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महिलांच्या तक्रारी आयोगाला प्राप्त होतात. या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी दरवेळी महिलांना मुंबईला जाणे सोईचे नसते. त्यासाठी जिल्हास्तरावर तक्रारींचे निराकरण करण्याकरीता प्रत्येक जिल्ह्यात जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जनसुनावणीमध्ये महिलांचा वेळ व पैसा वाचतो, सोबतच प्रत्यक्ष जागेवरच न्याय मिळत असल्याने महिलांना आश्वासक समाधानही मिळत आहे.

जन सुनावणीमध्ये कौटुंबिक हिंसाचारासोबतच बालविवाह, विधवांना भेडसावणाऱ्या समस्या, तसेच हुंडाबळी यांसारख्या गंभीर सामाजिक प्रश्नांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले. या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, विधी सेवा प्राधिकरण, भरोसा सेल, दामिनी पथक, वन स्टॉप सेंटर हे सक्रिय सहकार्य करीत असतात.

यावेळी आय-सी कमिटी (Internal Complaints Committee) संदर्भात 22 फेब्रुवारी 2025 रोजी जारी शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. प्रत्येक उद्योग, व्यवसाय व आस्थापनांमध्ये महिला कार्यरत आहेत. अशा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिंक अत्याचाराच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कायद्यानुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या जन सुनावणीमुळे अनेक महिलांना न्याय मिळाला आणि कुटुंबांमध्ये संवाद व सलोखा निर्माण झाला. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहभागी विभागांचे आणि समुपदेशकांचे कौतुक करत रुपाली चाकणकर यांनी हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे सांगितले.आजच्या जनसुनावणीमध्ये वैवाहिक समस्या/कौंटुबिक संबंधीत 52 तक्रारी,सामाजिक समस्या 1 ,मालमत्ता/आर्थिक  फसवणुक 05,कामाच्या ठिकाणी  महिलांचा होणार लैंगीक छळ 0, इतर 8 अश्या एकुण 66 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी जनसुनावणीव्दारे आयोग आपल्या दारी या उपक्रमाचे स्वागत केले.महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल,असे त्यांनी आश्वस्त केले.भंडारा जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलांची प्रकरणे संवेदनशीलरित्या हाताळली जात असून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस दलामार्फत महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. सायबर बॉट,दामीनी पथक,जागर नशामुक्तीचा या उपक्रमाबददल तसेच जिल्ह्यात पोलीस प्रशासनामार्फत सायबर गुन्हे बाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘भरोसा’ सेल पथक व समुपदेशन सेल पथकाद्वारे महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक  नुरूल हसन म्हणाले.प्रास्ताविक सदस्य  सचिव नदिंनी आवडे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी जनसुनावणी मागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अमिता खोब्रागडे यांनी केले.

तीन पॅनलद्वारे तक्रारींचे निराकरण

     महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरीता आयोजित जनसुनावणीसाठी तीन पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलमध्ये विधी तज्ञ, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, महिला व मुलांच्या सहाय्य कक्षाचे समुपदेशक तसेच अन्य अधिकारी, सदस्यांचा समावेश होता. या पॅनलने महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.

 जनसुनावणीस जिल्ह्यातील महिलांची उपस्थिती

        आयोगाच्या या जनसुनावणीस जिल्ह्यातील महिलांनी चांगली उपस्थिती दर्शविली. आलेल्या प्रत्येक महिलेस सुरुवातीस कक्षाच्या बाहेर लावण्यात आलेल्या नोंदणी टेबलवरून टोकन नंबर देण्यात आले. त्यानंतर देण्यात आलेल्या पॅनलसमोर उपस्थित राहून महिलांनी आपल्या लेखी तक्रारी, समस्या सादर केल्या. प्रत्येक महिलेचे म्हणणे पॅनल सदस्यांनी आत्मियतेने ऐकून घेतले व त्यावर कार्यवाही केली.

blank