
गोंदिया : गोंदिया जिल्हा प्राथमिक
शिक्षक सहकारी पतसंस्था र. नं. ०१ येथे अनावश्यक कर्मचारी भरती प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता झाल्याची बाब उघड झाली आहे. सभासदांच्या आमसभेत कर्मचारी भरतीसंदर्भात कोणताही ठराव मंजूर करण्यात आलेला नसताना, बनावट ठराव सादर करून भरतीस मान्यता घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब सहकार तत्त्वांना व कायदेशीर प्रक्रियेला हरताळ फासणारी आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर भरती प्रक्रिया त्वरित रद्द करण्याची मागणी शिक्षक सहकार संघटनेने केली आहे.
यासंदर्भात जवळपास ४०० सभासदांनी गुगल लिंकद्वारे आपले मत नोंदवून संबंधित ठराव अवैध असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. सभासदांच्या मतांचा आदर राखत व पारदर्शकतेसाठी शिक्षक सहकार संघटना, गोंदियातर्फे जिल्हा उपनिबंधक गोंदिया यांना निवेदन देऊन ही भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. बेकायदेशीर भरती तत्काळ रद्द करावी, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, भविष्यात अनावश्यक भरती होऊच नये, अशी मागणी निवेदनातून शिक्षक सहकार संघटनेने केली आहे.




