चारवेळा केली एमपीएसी क्रॅक
धामनगाव येथे नायब तहसीलदार पदी कार्यरत
युपीएससी मध्ये मिळवली ८३९ रॅंक
देवरी, दि.०७-काल घोषित झालेल्या २०२५ बॅचच्या संघ लोक सेवा आयोगाच्या परिक्षेच्या निकालामध्ये देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चिचेवाडा गावातील हेमकृष्ण प्रेमलाल पिसदे या आदिवासी युवकाने मानाचा झेंडा रोवला. परिणामी, हेमकृष्ण यांचे देवरी तालुक्यासह राज्यातूनही कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हेमकृष्ण याचा जन्म देवरी तालुक्यातील चिचेवाडा या अतिदुर्गम आदिवासी गावात झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण हे देवरी येथील मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयातून झाले. त्याने बीएची पदवी पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेज मधून संपादन केली तर एमएची पदवी सावित्रीबाई फुले महाविद्यालातून पूर्ण केली.
हेमकृष्ण याने चारवेळा महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्या असल्यातरी त्याचा डोळा युपीएसी परीक्षेवर होता. यामुळे चार वेळा एमपीएसीची परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी त्याला यामध्ये रस नव्हता. मुलगा एक ही नोकरी पत्करीत नसल्याचे पाहून वडील प्रेमलाल पिसदे यांनी त्याला नोकरी पत्करण्याची सल्ला दिला. म्हणून त्यानी मुंबई येथे पहिल्यांदा कामगार अधिकारी म्हणून नोकरीला सुरवात केली. पण त्यावर संतुष्ट न होता तो स्पर्धा परीक्षा देत राहिला. २०२५ मध्ये त्याची तहसीलदार पदी निवड झाल्याने अमरावती जिल्हातील धामनगाव येथे नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. सध्या हेमकृष्ण हा तेथे कार्यरत असताना काल युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये हेमकृष्ण याने संपूर्ण देशातून ८३९ रॅंक मिळवून यश संपादन केले आहे.
चिचेवाडा या त्याच्या जन्मगावात हेमकृष्णने मिळविलेल्या यशामुळे आनंदाचे वातावरण आहे. त्याचेवर संपूर्ण तालुक्यातील अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




