24.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा-निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे

शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा-निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे

0
29

वाशिम येथे मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन
वाशिम, दि. १० मार्च–  शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. नागरिकांना योजनांची अचूक माहिती मिळाल्यास त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडू शकतो, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले.

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने तहसील कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. घुगे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास निलेश पळसकर, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी स्वप्निल चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे-राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. घुगे म्हणाले की, शासनाच्या योजना केवळ कागदावर मर्यादित न राहता त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनासारखे उपक्रम जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम असून नागरिकांमध्ये योजनांबाबत सकारात्मक विश्वास निर्माण करतात. समाजातील अनुसूचित जाती, मागासवर्गीय तसेच दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी व्हावा, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा छायाचित्रे आणि माहिती फलकांच्या स्वरूपात नागरिकांसमोर मांडण्यात आल्या आहेत.तहसीलदार निलेश पळसकर म्हणाले, शासनाच्या योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त उपक्रम आहे. योजनांबाबतची सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या प्रदर्शनीस नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमामुळे शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी स्वप्नील चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आशा स्वयंसेविकांनी या प्रदर्शनाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.हा आगळावेगळा उपक्रम आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांची माहिती उपलब्ध होत आहे.जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे-राऊत यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनीमागील उद्देश आणि या उपक्रमाची रूपरेषा विषद केली. कार्यक्रमाचे संचालन करून उपस्थितांचे आभार अनिल कुरकुटे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजू जाधव, रुपेश सवाई, अनिल कुरकुटे आणि प्रमोद राठोड यांनी पुढाकार घेतला.या प्रसंगी आशा स्वयंसेविका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.