साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांना शेतकऱ्यांचा निवेदन
तुमसर, ३० जुलै –भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील ‘मानस ॲग्रो अँड इन्फ्रा लि. युनिट-४’ साखर कारखाना प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून लाखोंची आर्थिक फसवणूक केल्याचा तसेच शेतकऱ्यांचे उसाचे चुकारे थकवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनने आक्रमक भूमिका घेतली असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शेतकरी लंकेश तिजारे, सचिन मोहतुरे, अमोल मसराम, रोशन बांते, संजय झंझाड, पत्रकार अमित रंगारी उपस्थित होते.
स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित मेश्राम यांनी मानस ॲग्रोचे व्यवस्थापक रविशंकर बोरकर, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साखर कारखाना संचालक नितीन गडकरी, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते व भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांना २३ जुलै २०२६ रोजी पत्र पाठवून कारखान्याच्या मनमानी कारभाराची पोलखोल केली आहे.
साखर कारखान्यातील तब्बल ५२ कर्मचाऱ्यांच्या नावे ‘बँक ऑफ इंडिया’ (शाखा भंडारा) मधून कर्मचाऱ्यांना अंधारात ठेवून कर्ज (लोन) काढण्यात आले. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा न करता, कारखान्याच्या व्यवस्थापकीय समितीने परस्पर युनिटच्या अधिकृत खात्यात वळती केली. या आर्थिक फसवणुकीत बँक व्यवस्थापकही सामील असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.
राष्ट्रीयीकृत बँक आणि कारखान्याच्या संगनमताने झालेल्या या फसवणुकीमुळे त्रस्त झालेल्या पीडित कर्मचाऱ्यांनी कारखाना प्रशासनाविरोधात थेट आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांचे मागील ८ महिन्यांचे वेतन थकीत असून, गेल्या ३ वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी आणि विम्याचा हप्ता कंपनीने भरलेला नाही. त्याचप्रमाणे फेब्रुवारी २०२६ पासून शेतकऱ्यांच्या उसाचे चुकारे (पेमेंट) प्रलंबित असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या प्रकरणात शासन आणि प्रशासन काय भूमिका घेते आणि शेतकरी व कर्मचाऱ्यांना कधी न्याय मिळतो, याकडे आता संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
“५२ कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढून झालेली फसवणूक ही अत्यंत गंभीर बाब आहे. यात बँक अधिकारी आणि कारखाना प्रशासन दोषी असून, पीडित कर्मचाऱ्यांना व शेतकऱ्यांना त्यांचा हक्क न मिळाल्यास बेमुदत आमरण उपोषण केले जाईल.”
— अमित मेश्राम, संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य युवा एकता फाऊंडेशन तुमसर, जिल्हा भंडारा.
“आमच्या नकळत आमच्या नावे बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढून प्रशासनाने आमची फसवणूक केली आहे. मागील आठ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही आणि गेल्या तीन वर्षांपासून आमचा भविष्य निर्वाह निधी व विम्याचे हप्तेही भरलेले नाहीत. बँक आणि कारखाना प्रशासनाच्या या संगनमतामुळे आम्ही पूर्णपणे आर्थिक संकटात सापडलो असून, आम्हाला त्वरित न्याय न मिळाल्यास आमच्याकडे आत्मदहन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.”
–रोशन बांते, कर्मचारी, मानस आग्रो साखर कारखाना, देव्हाडा.
चौकट ..
मानस आग्रो ग्रुप नागपूरचे वरिष्ठ अधिकारी भंडारा येथे आले होते त्यावेळी कर्मचारी रोशन बांते यांना यासंदर्भात चर्चेसाठी बोलवण्यात आले होते परंतु त्या चर्चेला बांते उपस्थित होते किंवा नाही याची मला माहिती नाही. शेतकऱ्यांचे प्रलंबित चुकारे देण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर सुरू आहे.
–रविशंकर बोरकर, व्यवस्थापक, मानस आग्रो ग्रुप, साखर कारखाना देव्हाडा.





