
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे लोकसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन
नवी दिल्ली : देशात होऊ घातलेल्या जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा स्वतंत्र कॉलम असावा, या महत्त्वाच्या मागणीसाठी भंडारा–गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी संसद परिसरात आंदोलन केले.यावेळी त्यांनी विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी व वायनाडच्या खासदार प्रियकां गांधी यांचेही लक्ष वेधले.त्यांच्या हातातील फलकाकडे खासदार राहुल गांधी हे बघतच राहिले. लोकसभेच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. यावेळी विविध खासदारांनी त्यांच्या या मागणीला समर्थन दर्शवले. दरम्यान, संसदेतून निलंबनाची कारवाई झालेली असतानाही खासदार डॉ. पडोळे यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी असलेला आपला लढा थांबवलेला नाही. प्रत्येक दिवशी जिल्हा, राज्य आणि केंद्र पातळीवरील विविध लोकहिताचे प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. लोकशाही मार्गाने प्रश्न मांडत जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.

जनगणनेच्या संदर्भात बोलताना खासदार डॉ. पडोळे म्हणाले की, ओबीसी समाजाला सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या योग्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आगामी जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे देशातील ओबीसी समाजाची खरी लोकसंख्या व परिस्थिती समोर येईल आणि त्यानुसार धोरणात्मक निर्णय घेणे सरकारला शक्य होईल. आगामी जनगणनेत ओबीसीचा कॉलम असावा, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणार असून या विषयासाठी आणखी तीव्र आंदोलन करू, अशीही आक्रमक भूमिका खासदार डॉ. पडोळे यांनी मांडली.





