गोंदिया: जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पुन्हा एकदा जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याची घटना गुरुवारी १२ मार्च रोजी समोर आली आहे. तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वडेगाव–बंध्या परिसरात बुधवारी रात्री उशिरा गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने सुमारे २० ते २२ जंगली हत्तींचा कळप दाखल झाला. या कळपाने शेतशिवारातून मार्ग काढताना मका व भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दयाराम घुगुसकर व तेजराम गुरनुले या शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकाचे हत्तींच्या कळपाने नुकसान केले आहे. हत्तींचा कळप आल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच गोठणगाव व अर्जुनी-मोरगाव वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या वनविभागाच्या पथकाकडून हत्तींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.दरम्यान, अचानक हत्तींचा कळप गावाजवळ आल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतांमध्ये जाणे किंवा एकटे फिरणे टाळा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
गोठणगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी मिलिंद पवार यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा जंगलाच्या दिशेने जाणे टाळावे. तसेच हत्तींच्या हालचालींवर वनविभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनकर्मचारी सतर्क असल्याची माहिती दिली.





