28.4 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ समग्र शिक्षण विभागाच्या शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिरात ३२ दिव्यांग विद्यार्थ्यांची शस्त्रक्रियेसाठी निवड

समग्र शिक्षण विभागाच्या शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिरात ३२ दिव्यांग विद्यार्थ्यांची शस्त्रक्रियेसाठी निवड

0
3

गोंदिया, प्रतिनिधी :समग्र शिक्षण अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने अस्थिव्यंग (ऑर्थोपेडिक) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३२ दिव्यांग विद्यार्थ्यांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना शिबिरात उपस्थित करण्यासाठी विशेष शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. शिबिरात प्रविरा चाइल्ड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, आजनी (नागपूर) येथील डॉ. विराज शिंगाडे यांनी विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या शिबिरात शिक्षणाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, DEIC, RBSK पथकातील अधिकारी व कर्मचारी तसेच समग्र शिक्षणचे जिल्हा समन्वयक यांची पूर्णवेळ उपस्थिती होती. सर्व विभागांच्या समन्वयातून शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
समग्र शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक शस्त्रक्रिया व उपचारांची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या आरोग्याबरोबरच शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शिबिराच्या यशस्वितेसाठी जिल्हा समन्वयक विलास मलवार, विजय ठोकणे, RBSK चे समन्वयक संजय बिसेन, DEIC चे व्यवस्थापक पारस लोणारे, सल्लागार अजित सिंह तसेच सर्व विशेष शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.