26.3 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home शैक्षणिक लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये पर्यावरण जनजागृती शिक्षण मिळणार

लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये पर्यावरण जनजागृती शिक्षण मिळणार

0
51
गोंदिया(खेमेंद्र कटरे)दि.१३ मार्चः लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये पर्यावरण जनजागृती शिक्षण मिळणार आहे ,असे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. पर्यावरणाबाबत राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जगासमोर उभ्या असलेल्या हवामान बदलाच्या संकटाचा विचार करता विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवत असून केंब्रिज क्लायमेट क्वेस्टद्वारे हवामान शिक्षण त्याचाच एक भाग असून पर्यावरण जनजागृतीसाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणाले आहेत.
हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये हवामान साक्षरता विकसित करण्याच्या उद्देशाने राज्यातील शाळांमध्ये केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट हा ई-लर्निंग उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री म्हणाले की, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण, हवामान बदल आणि त्यासंबंधित विषयांवरील अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांपासून या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असून पुढे तो अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. याशिवाय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबतही जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, शाळा आणि घराच्या परिसरातील स्वच्छता याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. येत्या 2026 च्या जून महिन्यात पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये शालेय शिक्षण विभाग सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट हा ई-लर्निंग उपक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला आहे. शालेय शिक्षण विभाग व केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्यासोबत झालेल्या या सामंजस्य करारामुळे पर्यावरण कसे वाचवता येईल याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यास मदत होणार आहे. हवामान शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी हा उपक्रम चालू केला आहे. आठवी आणि नवव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता हा क्लायमेट क्वेस्ट ई-लर्निंग कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे पर्यावरण विषयक ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहे.