जालना,दि.१४ः-जिल्ह्यातील मंठा पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई केली. वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी मासिक हप्त्याची मागणी करणाऱ्या पोलिस निरीक्षकासह पोलिस अमलदाराला ३० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले, त्यामुळे मंठा पोलिस ठाण्यात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने ही सापळा कारवाई केली. या प्रकरणी पोलीस अमलदार रवी गणपत जाधव (ब.नं. ७८८) व पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदाराकडे अवैध वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी आरोपींनी दरमहा ५० हजार रुपये हप्ता मागितल्याचा आरोप आहे. त्यापैकी १० हजार रुपये आधीच घेतले होते आणि उर्वरित रक्कम देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र तक्रारदाराला लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
ACB पथकाने १२ मार्च रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता आरोपी पोलिस अमलदाराने ५० हजार रुपये हप्ता आणि स्वतःसाठी आणखी ५ हजार रुपये अशी मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तसेच पोलिस निरीक्षक राठोड यांनीही या व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याचे समोर आले.
यानंतर सापळा रचण्यात आला. तडजोडीनंतर ३० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे आरोपींनी मान्य केले. मंठा पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताच ACB पथकाने दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले.कारवाईदरम्यान आरोपी रवी जाधव यांच्या अंगझडतीत ३० हजारांची लाच रक्कम व सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. तर आरोपी मनोज राठोड यांच्याकडील मोबाईलही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर करीत आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांना पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.





