40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home शैक्षणिक मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक “शिक्षण ते रोजगार करिअर लाउंज” उभारणीस प्रारंभ

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक “शिक्षण ते रोजगार करिअर लाउंज” उभारणीस प्रारंभ

0
25

blank

मुंबई विद्यापीठ व भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय) यांच्यात ‘ई२ई करिअर लाउंज’ उपक्रमासाठी सामंजस्य करार

विद्यार्थ्यांना करिअर सुसज्जता, उद्योग अनुभव आणि प्लेसमेंटसाठी व्यापक व्यासपीठ

मुंबई, दि. १9 मार्चः विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध कौशल्ये देत त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठ आणि भारतीय उद्योग परिसंघ (कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ) यांच्यात ‘एज्युकेशन – टू- एम्प्लॉयमेंट (ई२ई) करिअर लाउंज’ स्थापन करण्यासाठी आज महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी कमी होऊन विद्यार्थ्यांना थेट रोजगाराच्या संधींशी जोडण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

विद्यार्थ्यांकडे उद्योगाला अपेक्षित कौशल्यांची उणीव तसेच शैक्षणिक ज्ञान आणि उद्योगाच्या अपेक्षा या पार्श्वभूमीवर सीआयआयकडून मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात उभारण्यात येणारे हे लाउंज भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा (एनसीएस) उपक्रमाशी सुसंगत असा हा प्रकल्प असून करिअर समुपदेशन, कौशल्य प्रशिक्षण, नोकरी सहाय्य आणि प्लेसमेंट सहाय्य अशा सर्व सुविधा विद्यार्थ्यांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या या कराराच्या स्वाक्षरी समारंभास कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, सीआयआयचे कार्यकारी संचालक सौगत रॉय चौधरी, सीआयआयचे प्रतिनिधी पृथाजित लाहिरी, दयाल कांगणे यांच्यासह गरवारे करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट संस्थेचे संचालक डॉ. केयुरकुमार नायक आणि सीटीपीसीचे संचालक प्रा. सचिन लबडे उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठ आणि सीआयआय यांच्या सहकार्याने सुरू होत असलेला ‘शिक्षण ते रोजगार करिअर लाउंज’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षण आणि उद्योग यांचे प्रभावी एकत्रीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता उद्योगसुसंगत कौशल्ये, प्रत्यक्ष अनुभव आणि करिअरविषयक स्पष्ट दिशा मिळणार असून उद्योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना बदलत्या तंत्रज्ञान व रोजगाराच्या गरजांशी जुळवून घेता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सीआयआयचे कार्यकारी संचालक सौगत रॉय चौधरी यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञान, विविध उद्योग क्षेत्रे आणि करिअर संधींबाबत अद्ययावत माहिती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच उद्योग तज्ज्ञांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात येणारे ‘ई२ई करिअर लाउंज’ विद्यार्थ्यांसाठी एक प्रभावी करिअर केंद्र ठरणार आहे. उद्योगाशी थेट संवाद, कौशल्य प्रशिक्षण आणि प्लेसमेंट मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासातून व्यावसायिक क्षेत्रात सहज संक्रमण साधता येईल. हा उपक्रम शिक्षण व उद्योग यांच्यातील मजबूत दुवा निर्माण करून विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल करिअरच्या संधी निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. या उपक्रमाचे समन्वयन मुंबई विद्यापीठाच्या करिअर प्रशिक्षण व प्लेसमेंट कक्षामार्फत करण्यात येणार आहे.

blank