
सीईओ एम. मुरूगानंथम यांचे आवाहन : जिल्हा परिषदेचे आयोजन; 4 लक्ष 38 हजारांचे 60 पुरस्कार
गोंदिया, ता. 20 : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने मुख्यमंत्री संमृध्द पंचायत राज अभियान आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता सहावी ते 12 पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सुमारे 4 लक्ष 38 हजार रुपयांचे पुरस्कार जिंकता येणार आहे. जिल्हयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. एम. मुरूगानंथम यांनी केले आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा तीन स्तरावर या स्पर्धा घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायतस्तरावर या स्पर्धा 19 ते 23 मार्च दरम्यान आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर इयत्ता सहावी ते 12 पर्यंतचा एकच गट राहणार असून त्यातून प्रत्येक स्पर्धेसाठी एका स्पर्धकाची निवड करून त्यांना तालुकास्तरी स्पर्धेसाठी पाठवायचे आहे. तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहेत. यात इयत्ता सहावी ते आठवीचा एक आणि इयत्ता नववी ते बारावीचा दुसरा गट राहील. तालुकास्तरीय स्पर्धा पंचायत समिती कार्यालय परिसरात तर जिल्हास्तरीय स्पर्धा या जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात घेण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतस्तरावर वक्तृत्व स्पर्धेसाठी विकसीत आनंदी गाव, स्वच्छ हरीत आरोग्यदायी गाव, गावपातळीवरील संस्था संक्षमीकरण हे विषय राहणार आहेत. इयत्ता सहावी ते आठवीच्या तालुकास्तरावरील वक्तृत्व स्पर्धेसाठी माझे गाव स्वच्छ गाव, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, तर जिल्हास्तरावर ग्रामीण विकासात लोकसहभाग, हवामान बदल आणि ग्रामीण जीवनावर होणारे परिणाम, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण हे विषय राहतील. इयत्ता नववी ते बारावीच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी तालुकास्तरावर विकसीत आनंदी गाव, स्वच्छ हरित आरोग्यदायी गाव, सामाजिक न्याय तर याच गटात जिल्हास्तरावर वक्तृत्व स्पर्धेसाठी ग्राम विकासात तरूणांची भूमिका, आदर्श गाव घडविण्यात लोकसहभाग, उपजीविका विकास, सामाजिक न्याय हे विषय राहणार आहेत. निबंध स्पर्धेत ग्रामपंचायतस्तरावर ऍ़निमिया मुक्त गाव, सौर ऊर्जा, पर्यावरण संवर्धन युक्त गाव, सुशासनयुक्त गाव हे विषय राहणार आहेत. तालुकास्तरावर इयत्ता सहावी ते आठवीसाठी हवामानबदल आणि ग्रामीण जीवनावर होणारे परिणाम, लोकसहभाग श्रमदानातून लोकचळवळ जिल्हास्तरावर निबंध स्पर्धेत हरित ऊर्जा गाव, इको फ्रेंडली व्हीलेज, लोकसहभाग श्रमदानातून लोकचळवळ हे विषय राहतील. इयत्ता नववी ते बारावीसाठी तालुकास्तरावर निबंध स्पर्धेत डिजिटल खेडी आणि भविष्यातील संधी, सक्षम पंचायत तर जिल्हास्तरावर निबंध स्पर्धेसाठी पाणी स्वच्छता आणि आरोग्याचे महत्व, शाश्वत भविष्यासाठी शाश्वत गावे, सक्षम पंचायत हे विषय राहणार आहेत. चित्रकला स्पर्धेत ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छ आणि हरित गाव, पर्यावरण स्नेही गाव हे विषय राहतील. तालुकास्तरावर चित्रकला स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवीसाठी निसर्ग चित्र (आपल्या गावाशी संबधीत), पर्यावरण स्नेही गाव तर जिल्हास्तरावर पाणी वाचवा भविष्य वाचवा, झाडे वाचवा पृथ्वी वाचवा हे विषय राहतील. इयत्ता नववी ते बारावीच्या गटात तालुकास्तरावर चित्रकला स्पर्धेत झाडे वाचवा पृथ्वी वाचवा, माझे गाव स्वच्छ गाव आणि जिल्हास्तरावर स्वच्छ पर्यावरण आरोग्यदायी गाव, हरित ऊर्जा गाव, तुमच्या गावाची संस्कृती हे विषय राहणार आहेत. वक्तृत्व स्पर्धेसाठी एका स्पर्धकाला पाच मिनीटांचा कालवधी देण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी शब्दमर्यादा किमान 200 शब्दांची राहील. त्यापेक्षा अधिक शब्दांमध्ये विद्यार्थ्यांना निबंध लिहीता येईल. निबंध आणि चित्रकाला स्पर्धेसाठी प्रत्येकी एक तासाचा वेळ देण्यात येणार आहे. वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा ही मराठी भाषेतूनच घेण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धेसाठी वाटर कलर अथवा आईल कलर वापरण्याची परवानगी असून कलर विद्यार्थ्यांनी स्वत: आणायचे आहे. विशेष म्हणजे, जिल्हास्तरीय तिन्ही स्पर्धेसाठी सूचीबध्द केलेल्या विषयांपैकी विद्यार्थ्यांना कोणताही एक विषय एक तासापूर्वी कळविण्यात येईल. त्याच विषयावर विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घ्यावयाचे आहे. तालुका आणि जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी दोन्ही गटातील तिन्ही स्पर्धेसाठी प्रत्येकी पाच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तालुकास्तरावरील प्रत्येक स्पर्धेतील प्रथम आणि व्दितीय आलेल्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील दोन्ही गटासाठी तिन्ही स्पर्धेसाठी प्रत्येकी प्रथम दोन हजार, व्दितीय 1500, तृतीय 1000, चवथे 750 आणि पाचवे रूपये 500 चे रोख पारितोषित प्रदान करण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरीय दोन्ही गटातील तिन्ही स्पर्धेसाठी प्रथम 10 हजार, व्दितीय 7500, तृतीय पाच हजार, चवथे तीन हजार आणि पाचवे रूपये 1500 रोख, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. तिन्ही स्पर्धेसाठी तालुकास्तरावर 30 आणि जिल्हास्तरावर 30 असे एकूण 60 पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्हास्तरावर स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनीक आणि पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांनी कळविले आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे तथा अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालय अथवा संबधित शाळेत संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
——
स्पर्धेचे वेळापत्रक
ग्रामपंचायतस्तरावरील स्पर्धा या 19 ते 23 मार्च दरम्यान आयोजित करावयाच्या आहेत. तालुकास्तरीय स्पर्धादिनांक 25 मार्च रोजी तर जिल्हास्तरीय स्पर्धा 27 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहेत.





