
अर्जुनी-मोर.,दि.२०-गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील मका उत्पादन तयार होत असूनही अद्याप शासनाकडून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल, गोंदिया जिल्ह्याच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदन देऊन तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या बाजारात मक्याला केवळ १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे, तर शासनाचा हमीभाव सुमारे २४०० रुपये प्रति क्विंटल आहे. या मोठ्या तफावतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना कमी दरात मका विकावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
तसेच, गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आधीच विविध नैसर्गिक व आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी लोकपाल गहाणे (तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष), किशोर तरोणे (अध्यक्ष, ओबीसी सेल, गोंदिया जिल्हा), दानेश साखरे (सभापती, बांधकाम, नगरपंचायत अर्जुनी मोरगाव), शालिक हातझाडे (नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) तसेच आर. के. जांभुळकर (तालुका अध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी मोरगाव) उपस्थित होते.
निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन खासदार प्रफुल पटेल यांनी दिले.





