23.4 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home गुन्हेवार्ता गोवंश तस्करांवर केशोरी पोलिसांची कारवाई

गोवंश तस्करांवर केशोरी पोलिसांची कारवाई

0
34

अर्जुनी मोर.: गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध केशोरी पोलिसांनी जोरदार कारवाई करत तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पहाटेच्या सापळ्यात दोन आरोपींना रंगेहात पकडत ७ बैलांची सुटका करण्यात आली असून दोन पिकअप वाहनांसह सुमारे ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील साई टेकडी परिसरातील नहराजवळ बुधवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास ही धडक कारवाई पार पडली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहने अडवली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

अल्ताफ कादर शेख (रा. बुटाई) याच्या महिंद्रा पिकअपमध्ये ४ बैल तर पितांबर सदाशिव पेटकुले (रा. गराटोला) याच्या पिकअपमध्ये ३ बैल क्रूरतेने कोंबून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे दिसून आले. बैलांना अमानुषपणे बांधण्यात आल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. पोलिसांनी तातडीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेत बैलांची सुटका केली.या प्रकरणी केशोरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६०/२०२६ नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा तसेच प्राणी छळ प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम नवले, पोलीस हवालदार प्रेमदास होळी, अन्वर अली सय्यद, धनराज सयाम व पोलीस शिपाई गाते यांनी पार पाडली. पुढील तपास पोलीस हवालदार अजय मौजे करीत आहेत. या कारवाईमुळे परिसरात गोवंश तस्करी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून केशोरी पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.