गोंदिया:मुलाच्या टी-शर्टला हात पुसल्यावरून झालेल्या वादातून महिलेवर धारदार वस्तूने हल्ला करणाऱ्या आरोपीला गोंदिया न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी योगेश्वरी राऊत यांनी या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवत ३,००० रुपये दंड आणि एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीची (Good Behavior) शिक्षा सुनावली आहे.
नेमकी काय आहे घटना?
ही घटना २७ ऑक्टोबर २०२१ रोजी गोंदिया शहरातील कुंभारटोली (वाजपेयी वार्ड) परिसरात घडली होती. तक्रारदार रेखा राधेश्याम मोहनानी (वय ४६) यांचा मुलगा घराशेजारी सुरू असलेल्या एका वास्तू पूजनाच्या जेवणावळीत गेला होता. त्यावेळी आरोपी राज भिकम देशमुख (वय २०, रा. कुंभारटोली) याने लहान मुलाच्या टी-शर्टला आपले तोंड आणि हात पुसले.या प्रकाराबाबत रेखा मोहनानी यांनी आरोपीला हटकले असता, राज देशमुख याने त्यांच्याशी जोरदार भांडण करून शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, आपल्या खिशातून चाकू सारखी टोकदार वस्तू काढून त्याने रेखा यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार करून त्यांना जखमी केले. या घटनेनंतर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास आणि न्यायालयात दोषसिद्धी
गोंदिया शहर पोलिसांचे पोलीस हवालदार विवेक यादव (ब. क्र. २८७) यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र (खटला क्रमांक ७४/२०२२) दाखल केले.न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता प्रणिता जोशी (कुलकर्णी) यांनी जोरदार युक्तिवाद केला. साक्षीदारांची साक्ष आणि सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे मुख्य न्यायदंडाधिकारी योगेश्वरी राऊत यांनी आरोपी राज देशमुख याला दोषी ठरवत १ वर्षाची चांगली वर्तनुक व ३,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पोलीस पथकाचे कौतुक
न्यायालयीन कामकाजात महिला पोलीस शिपाई जैस्वाल (ब. नं. ४४९) यांनी सहकार्य केले. या गुन्ह्याचा उत्कृष्ट आणि गतीने तपास करून आरोपीला शिक्षा मिळवून दिल्याबद्दल गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील दरेकर आणि पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.





