भंडारा :- शहरात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या गंभीर गुन्हेगारी घटनांनी शहराच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मंगळवारी (१८ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मेंढा परिसरातील नेहरू गार्डनजवळ एका अल्पवयीन शाळकरी मुलाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. अंशु गजानन येरकडे (१५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या हत्येतील संशयितही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
अंशु हा भागीरथ भास्कर शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तो घरी परतत असताना घराजवळच ही घटना घडल्याचे समजते. घटनास्थळी त्याचे दप्तर पडलेले आढळून आले. त्यामुळे काही वेळातच परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, अंशु आणि संशयित अल्पवयीन मुलगा मित्र होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी दोघे भेटून चर्चा करीत असताना पुन्हा वाद झाला. यावेळी अंशुकडे असलेल्या गुप्तीवरून झटापट झाली. गुप्ती हिसकावून घेत संशयिताने अंशुवर वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेनंतर अंशुच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संशयिताला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. यावेळी काही काळ पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.





