38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News महाराष्ट्राची माओवादी हिंसाचार मुक्तीच्या दिशेने वाटचाल-पोलिस अधीक्षक निलोत्पल

महाराष्ट्राची माओवादी हिंसाचार मुक्तीच्या दिशेने वाटचाल-पोलिस अधीक्षक निलोत्पल

0
50

blank

लवकरच लक्ष्य साध्य होणार, गडचिरोली पोलिसांना पूर्ण विश्वास

गडचिरोली/गोंदिया, दि. ३०– ‘माओवाद्यांच्या कारवायांविरोधात पोलीस विभागाने अभूतपूर्व कामगिरी बजावली असून महाराष्ट्र आता माओवादी हिंसाचारापासून मुक्तीच्या दिशेने अग्रभागी आहे. गत काही दिवसांत गडचिरोलीतील गावांमध्ये माओवाद्यांच्या हालचाली दिसून आलेल्या नसल्या तरी ६ माओवादी कॅडर्स अद्यापही महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील अबुजमाडच्या क्षेत्रात दिसून आले आहेत. त्यांनी आत्मसमर्पण करावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. अन्यथा, सुरक्षा दलांना अभियान राबवावे लागेल’, अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी(दि.३० मार्च) दिली आहे.

देशभरात माओवादी कारवाया संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ ही मुदत निश्चित केली आहे. या मुदतीच्या पार्श्वभूमीवर माओवादी हिंसाचाराचा नायनाट करण्यात महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी अभूतपूर्व अशीच राहिलेली आहे. ‘मागील दोन वर्षात गडचिरोली आणि गोंदियात पोलिसांनी केलेली कारवाई आणि सध्याची एकूणच परिस्थिती पाहता आम्ही आमचे लक्ष्य साध्य करण्याच्या उंबरठ्यावर आहोत,’ असे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

‘फेब्रुवारीपासून माओवाद्यांच्या कुठल्याही हालचाली आमच्या रेकॉर्डवर नाहीत. पण, त्यांचे आमच्या रेकॉर्डवर असलेले ६ कॅडर्स अद्यापही शिल्लक असून पूर्वी त्यांच्या हालचाली महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर दिसून आल्या होत्या. त्यापैकी ५ कॅडर्स छत्तीसगड तर एक जण गडचिरोलीचा असल्याची आमची माहिती आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही गावात त्यांचा वावर नाही,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.

शेजारच्या छत्तीसगड आणि झारखंडमध्ये अद्यापही अनुक्रमे ५० आणि ६० च्या संख्येने सशस्त्र माओवादी शिल्लक असल्याची माहिती असून त्यांचे आत्मसमर्पण व्हावे, यासाठी तेथील राज्य दलांचे प्रयत्न सुरु आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उत्तर गडचिरोलीपासून सुरुवात
गोंदिया जिल्ह्यात यापूर्वीच माओवाद्यांच्या कारवायांवर पूर्णपणे अंकूश लावण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले होते. मात्र, गडचिरोली जिल्ह्याच्या बाबतीत ही परिस्थिती नव्हती. १ जानेवारी, २०२४ पर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्हा पोलिसांच्या रेकॉर्डवर प्रभावित मानला गेला होता. त्यानंतर गडचिरोली पोलिसांनी जुलै २०२४ पर्यंत संपूर्ण उत्तर गडचिरोली भागावर लक्ष केंद्रित करून माओवादी हिंसाचार मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. २०२५ मध्ये पोलिसांनी माओवाद्यांचे सर्वच्या सर्व दलम संपुष्टात आणण्यात पोलिसांना यश आले. २०२६ च्या सुरुवातीला माओवाद्यांची कंपनी क्रमांक १० म्हणून ओळखली जाणारी शेवटची रचनाच संपुष्टात आणण्यात पोलिसांना यश आले. २६ लाखांचे बक्षीस शिरावर असलेला माओवादी नेता प्रभाकर याच्यासह काही सशस्त्र माओवादी पोलिस दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. दुर्दैवाने, या अभियानात एका पोलिस जवान शहीद झाला.

ऐतिहासिक यश
माओवाद्यांना आत्मसमर्पण करायला प्रवृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने २०२५ हे वर्ष महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरले. यावर्षात तब्बल ११२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी माओवाद्यांचा पॉलीस ब्युरो सदस्य असलेला मलोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याने आपले ६१ साथीदार आणि ५४ शस्त्रांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. ‘ही घडामोड राज्यात माओवाद्यांचे कंबरडे मोडण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरली,’ असे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांना वाटते.

शेवटची प्रतीके हटविली
१८ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी एटापल्ली, हैदरी, भामरागड, जिमलगट्टा, धानोरा आणि पेंढरी परिसरात गडचिरोली पोलिस, सीआरपीएफ व विशेष पथकांनी एक विशेष मोहीम राबविली. माओवादी दहशतीची शिल्लक प्रतिके ठरलेली तब्बल ४४ स्मारके उध्वस्त करण्याची निर्णायक कामगिरी सुरक्षा दलांनी बजावली.

संपूर्ण जिल्हा पोलिसांच्या नजरेखाली
माओवाद्यांविरुद्ध पोलिसांचे अभियान सुरु असतानाच दुसरीकडे गडचिरोलीच्या संपूर्ण परिसरात पोलिसांची उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात आले. ‘मागील ३ वर्षात आम्ही दुर्गम भागात तब्बल ११ पोलिस आऊटपोस्ट्स उभारल्या आहेत. नुकतीच १९ मार्च रोजी बंगाडी येथे शेवटची आऊटपोस्ट सुरु करण्यात पोलिसांना यश आले. पूर्वी तब्बल ३ हजार किलो मीटरचे क्षेत्र पोलिसांच्या आवाक्यात नव्हते. ही पोकळी भरून काढल्यावर आता पोलिस पथके गडचिरोलीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात झटपट पोहोचू शकतात,’ असे निलोत्पल यांनी सांगितले.

चौकट..
माओवादी हिंसाचारात महाराष्ट्र..
-आतापर्यंत २४४ पोलिस जवान शहीद
-माओवाद्यांकडून ६०२ नागरिकांचा बळी
-७९४ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

blank