गोंदिया : देवरी पोलिसांनी २५ मार्च रोजी झालेल्या घरफोडीचा उलगडा करीत आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून मोबाइल, चांदीचे दागिने व रोख, असा एकूण २० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.२५ मार्च देवरी येथे अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी घरफोडी करून मोबाइल, सोन्या-चांदीचे दागिने व रोख चोरून नेली होती. याप्रकरणी देवरी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३०५ (अ)
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी शिवम मधुकर मडावी (२०) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेले दोन मोबाइल, चांदीचे दागिने व रोख, असा एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे व उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मानिकपुरी करीत आहेत.





