गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांची दहशत संपुष्टात आली असतानाच, नक्षलवाद्यांच्या नावाचा वापर करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर गडचिरोली पोलीस दलाने पुन्हा एकदा कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोमके फुलणार हद्दीत माओवादी असल्याचा बनाव करत बॅनर आणि पत्रके लावून दहशत निर्माण करणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली.
काय आहे संपूर्ण प्रकरण? गत २५ जुलै २०२६ रोजी पोमके फुलणारपासून साधारण ८ किलोमीटर अंतरावर हिद्दुर-दोबुर मार्गावर दोन झाडांच्या दरम्यान लाल रंगाचे कापडी बॅनर आणि पांढऱ्या रंगाचे पोस्टर आढळले होते. या बॅनर आणि पोस्टरवर नागरिकांमध्ये दहशत निर्माण होईल अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला होता. गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त झाला असताना अशा प्रकारे पत्रके आढळल्याने पोलीस प्रशासनाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली. याप्रकरणी पोलीस ठाणे कोठी येथे भारतीय न्याय संहिता आणि बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये (UAPA) गुन्हा दाखल करून तपासाचे चक्र वेगाने फिरवण्यात आले.
तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या सूचनेनुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने विशेष शोध मोहीम राबवण्यात आली. तपासादरम्यान तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पोलिसांना मोठे यश मिळाले. माओवादी असल्याचा बनाव करून दहशत पसरवणारे ६ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
अटक करण्यात आलेले आरोपी : १. जोगा रैनु धुर्वा (वय ४० वर्ष, रा. मिरगुळवंचा, ता. भामरागड) २. मालु कांडे धुर्वा (वय ४२ वर्ष, रा. मिरगुळवंचा, ता. भामरागड) ३. दलसु मर्रा तेलामी (वय ५० वर्ष, रा. कृष्णार, ता. भामरागड) ४. चैतु डूंगा धुर्वा (वय ५३ वर्ष, रा. दोबुर, ता. भामरागड) ५. गणेश देवू आलामी (वय ४० वर्ष, रा. पोयारकोठी, ता. भामरागड) ६. राजेश दल्लु वड्डे (वय ३२ वर्ष, रा. मिरगुळवंचा, ता. भामरागड)पोलीस तपासात या सर्व सहा जणांनी स्वतः माओवादी असल्याचे भासवून ही पत्रके आणि बॅनर लावल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी इतरही काही संशयितांचा शोध सुरू आहे.
भूलथापांना बळी पडू नका : पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे आवाहन गडचिरोली पोलीस दलाने “ऑपरेशन अंतिम प्रहार” च्या माध्यमातून जिल्ह्यातील माओवाद्यांची दहशत पूर्णपणे संपुष्टात आणली असून अभिलेखावर एकही माओवादी शिल्लक नाही, असा स्पष्ट पुनरुच्चार पोलीस अधीक्षकांनी केला. तसेच आगामी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी माओवादाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही भूलथापांना किंवा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी केले आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये कोणीही सहभागी होऊ नये; अन्यथा नागरिकांमध्ये भीती पसरवणाऱ्यांवर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.





