अमरावती– अमरावती जिल्ह्यातील भानखेडा रोडवरील जंगल परिसरात 28 मार्च रोजी 18 वर्षीय तरुणीसोबत घडलेल्या अत्याचार घटनेनंतर पोलिसांनी तपासाची (Crime News) चक्रे फिरवली. तसेच 5 नराधमांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं.तसेच तिच्यासोबत असणाऱ्या तरुणालाही बेदम मारलं. 5 जणांनी दोघांची वाट अडवत हे भयंकर कृत्य केलं. 28 मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर अमरावती हादरली होती. दरम्यान, या प्रकरणात तब्बल एक आठवड्यानंतर पाचही नराधमांची ओळख पटली. फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
पीडित तरुणीनं पाचही आरोपींना ओळखलं
मिळालेल्या माहितीनुसार, दि.3 रोजी रात्री उशिरा मध्यवर्ती कारागृहात दंडाधिकाऱ्यांसमोर ओळख परेड घेण्यात आली होती. पीडित तरुणीसमोर पाचही नराधमांना उभं करण्यात आलं होतं. दरम्यान, पीडितेनं ओळख परेडमध्ये पाचही आरोपींना ओळखले. सर्व पाचही आरोपी भानखेडा गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. डीसीपी गणेश शिंदे यांनी पाचही आरोपींची नावे आणि चेहरे अधिकृतपणे जाहीर केले आहे. दरम्यान, पाचही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता, त्यांनी याआधी दरोडे टाकले असल्याची माहिती आहे.
ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे (वय वर्ष 34), दिवाकर श्रीकृष्ण मरस्कोल्हे (वय वर्ष 25), प्रमोद नारायण वाघाडे (वय वर्ष 31), शुभम उर्फ सोमेश्वर नारायण वाघाडे (वय वर्ष 28) आणि उमेश बेनिराम भोयर ( वय वर्ष 47) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींची ओळख पटताच पोलिसांनी या नराधमांची नावे अधिकृतपणे जाहीर केली आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.
अमरावती जिल्ह्यातील भानखेडा रोडवरील जंगल परिसरात घटनेच्या दिवशी पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन जात होती. यावेळी पाच जणांच्या टोळीनं त्यांची वाट अडवली. तसेच दोघांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. मारहाण करत असताना आरोपींनी पीडितेच्या मित्राच्या खिशातून 120 रुपयेही जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान, त्यातील एका नराधमाची वाईट नजर पीडितेवर पडली. त्यानं तरुणीवर बळजबरी केली.अत्याचारानंतर पीडित तरुणीची प्रकृती प्रचंड खालावली. तसेच तिच्यासोबत असणाऱ्या तरुणाचीही प्रकृती बिघडली. पीडितेला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, फ्रेजरपुरा पोलिसांनी शोधमोहिम राबवत पाचही आरोपींना अटक केली असून, त्यांची नावेही उघड जाहीर केली आहेत.





