जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा निर्धार
धाराशिव,दि.10 एप्रिल – छत्रपती संभाजीनगर येथील मंथन सभागृह,एम.आय.टी.इंजिनीअरिंग कॉलेज येथे ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ या विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यशाळेत तेरा जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होते.
कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,उपमहापौर राजेंद्र जंजाळ, धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपाध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्यासह सरपंच,पंचायत समिती सभापती व विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की,“‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे केवळ अभियान नसून लोकसहभागातून उभी राहणारी व्यापक आरोग्य चळवळ आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा घरपोच उपलब्ध होतील. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे हे या अभियानाचे वैशिष्ट्य आहे. गावागावांत जनजागृती करून तपासण्यांची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे,असे सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी धाराशिव जिल्हा पूर्णपणे ‘आरोग्य संपन्न’ करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. त्या म्हणाल्या,आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शासनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण कायापालट करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. असे त्या म्हणाल्या.
या अभियानात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासोबतच ग्रामविकास, महिला व बालकल्याण, शिक्षण तसेच इतर सर्व विभागांचा समन्वय साधला जाणार असून लोकसहभागातून ही चळवळ प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
उपाध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करताना ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या माध्यमातून लसीकरण, माता-बाल संगोपन व स्वच्छता मोहिमेला अधिक गती देण्यात येणार असल्याचे सांगितले.





