धाराशिव,दि.१२ एप्रिल-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,धाराशिव यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत दि.११ रोजी वडगाव (ता.धाराशिव) येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर,स्वच्छता अभियान तसेच प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे ५२ तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, तर ९८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी श्री.सनम लामकने,मुरूम नगरपरिषदेचे नगराधिकारी सचिन भुजबळ,प्रमुख व्याख्याते किरण सगर, बार्टीचे प्रकल्प अधिकारी तुषार कदम, समतादूत नागेश फुलसुंदर,किरण चिंचोले,रमेश नरवडे,गणेश मोटे, गोविंद लोमटे,सुहास वाघमारे, अर्चना रणदिवे यांच्यासह गावातील उपसरपंच बबन फुलसुंदर,शालेय समिती अध्यक्ष सचिन पवार, सदस्य सतीश पाटील,किरण फुलसुंदर, शेटीबा पवार,दिलीप माळी,मदार सय्यद,आदम सय्यद तसेच आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.त्यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना,मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना,स्वाधार योजना, ऍट्रॉसिटी कायदा,बचत गटांना ट्रॅक्टर वाटप,जात पडताळणी आदी योजनांची माहिती दिली.
प्रमुख व्याख्याते किरण सगर यांनी अनिष्ट रूढी-परंपरा व बुवा-बापू यांच्या आहारी न जाता महापुरुषांचे विचार आत्मसात करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला.दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते गावातील नव्याने पोलीस व सैन्यात भरती झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले व सरपंच बबन फुलसुंदर यांच्या वतीने पाण्याचे जार भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश फुलसुंदर यांनी केले,प्रास्ताविक तुषार कदम यांनी केले तर आभार ग्रामसेवक श्री.जी.व्हि.करदोरे यांनी मानले.कार्यक्रमास गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.





