अर्जुनी मोरगाव-रानटी हत्तींच्या कळपाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. ३२ हत्तींच्या कळपाने शेत शिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. स्थानिक वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कवठा बीट क्रमांक दोन अंतर्गत राघोबा देवस्थान जंगल परिसरात हत्तींच्या कळपाने बस्तान मांडल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार वडेगाव बंड्या सीमा पार करून महागाव मार्गाने मलकापूर नवनीतपूर शेत शिवारात हत्तींच्या कळपाने प्रवेश केला होता. ११ एप्रिल रोजी तालुक्यातील निलज रामघाट येथे हत्तींच्या कळपाने शेत शिवारात मोठा धुमाकूळ घातला आहे. पिकांच्या सभोवताली झटका मशीन लावली असतानासुद्धा त्या ठिकाणाहून प्रवेश न करता एका घराच्या सांदवाडीतून हत्ती निघून गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या हत्तींचा कळप कवठा बीट क्रमांक दोनमध्ये असल्याचे दिसून आले आहे. हत्तींचा कळप कानोली, गोठणगाव, खैरी सुकळी मार्गाकडे वळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.





