भंडारा, दि. 15 : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच समता सप्ताहाच्या औचित्याने तालुका लाखांदूर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. पंकज भोयर, डॉ. प्रशांत पडोळे, नानाभाऊ पटोले आणि डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते नागरी हक्क संरक्षण (ॲट्रॉसिटी) प्रकरणातील मृतकांच्या 7 वारसांना वर्ग-4 (शिपाई) पदावर शासकीय नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले.अशा विविध उपक्रमांमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचा महोत्सव जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला.
समता सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, संविधान जनजागृती मोहीम तसेच विविध शासकीय योजनांचा चित्ररथाद्वारे प्रसार करण्यात आला. शासकीय वसतिगृहांमध्ये निबंध, रांगोळी, वक्तृत्व, गीतगायन स्पर्धा तसेच पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले.
या अनुषंगाने दि. 14 एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. सुमारे 250 विद्यार्थी व कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी 8 वाजता आशा कवाडे, सहाय्यक आयुक्त यांनी सामाजिक न्याय भवन येथून रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. रॅली त्रिमूर्ती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आली. तेथे प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅली पुन्हा सामाजिक न्याय भवन येथे परत आली.
यानंतर सामाजिक न्याय भवन येथे समता सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी दीपाली मोतीयेळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून रूपचंद रामटेके, कार्तिकस्वामी मेश्राम आणि परिवर्तन शिक्षण संस्था वासेडाचे सचिव संजय घोडके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविक आशा कवाडे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रामधून शासकीय सेवेत रुजू झालेल्या 7 विद्यार्थ्यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन वृक्षवल्ली तागडे व नूतन इटनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन योगराज सावरबांधे यांनी केले.





