
धाबेटेकडी / आदर्श गावात भीतीचे सावट
गोंदिया,दि.१६-जिल्ह्याच्या सीमेवरील घनदाट जंगलालगत असलेल्या अर्जुनी-मोर तालुक्यातील धाबेटेकडी/आदर्श परिसरात बिबट्यांची दहशत अजूनही कायम असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एका बिबट्याला वनविभागाने जेरबंद करून दुसऱ्या जंगलात हलविल्यानंतरही दुसऱ्या बिबट्याचा वावर सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
१० एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास अंगणात खेळत असलेल्या प्रज्वल गोवर्धन मेश्राम (वय ६) या चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेऊन सुमारे ५०० मीटर अंतरावरील जंगलात ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. या घटनेनंतर गावात भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थ दिवस व रात्र जीव मुठीत धरून वावरत आहेत.यानंतर १३ एप्रिल रोजी रात्री बिबट्याने राजू इनवाते यांच्या गोठ्यातील म्हशीच्या पिल्लावर हल्ला करून त्याला ठार केले. या पार्श्वभूमीवर वनविभागाने १० एप्रिलपासूनच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते.अखेर १४ एप्रिल रोजी संबंधित बिबट्याला जेरबंद करुन दुसऱ्या जंगलात हलविल्याने ग्रामस्थांनी काही प्रमाणात दिलासा घेतला होता.मात्र १५ एप्रिलच्या रात्री पुन्हा गावात बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
सध्या परिसरात उन्हाळी धान, मका तसेच मोहफूल वेचण्याचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी व मजूर मोठ्या संख्येने शेतात व जंगल परिसरात जात असतात. अशा परिस्थितीत बिबट्यांचा गावाकडे वाढता वावर ग्रामस्थांसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे.





