देवरी,दि.१६- नुकत्याच घोषित झालेल्या सीबीएससी बोर्ड वर्ग दहावी परीक्षेच्या निकालामध्ये, स्थानिक देवरी येथील कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था देवरी द्वारा संचालित तालुक्यातील अग्रगण्य सी.एस.इंग्लिश पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
आर्या राजेश रामटेके हिने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला 94 % गुण मिळाले आहेत. तसेच विद्यालयातील विद्यार्थी सलमान खान शाहिद खान पठाण याने तालुक्यातून द्वितीय क्रमांक अल्पसंख्यामध्ये तालुका मध्ये पहिल्यांदा पटकावला असून त्याला 93. 20% गुण मिळाले आहेत. तसेच तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर तीन विध्यार्थी अनुक्रमे इशिका संजय बोरकर, समृद्धी राऊत, आणि शिवम विनोद बहेकार यांनी प्रत्येकी 92 % गुण प्राप्त केले आहेत. तर तालुक्यातून चौथ्या क्रमांकावर खिशल संतोष मेश्राम हिने 90 टक्के गुण प्राप्त केले आहेत.
विशेषतः या विद्यालयातील एकूण तेरा विद्यार्थ्यांनी तालुक्यातून सलग क्रमांक पटकावलेला आहे. त्यामुळे या विद्यालयाचे यश अधोरेखित होत आहे.
या निमित्याने विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थेच्या फार्मसी कॉलेजच्या दालनामध्ये करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष श्री झामसिंग येरणे, सचिव श्री अनिल कुमार येरणे विद्यालयाचे प्राचार्य श्री अश्मित पिल्लई, वर्गशिक्षक कार्तिक कोकावार तसेच विद्यालयातील इतर शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक तसेच सत्कारमूर्ती विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमात पालकांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यालयातील शिक्षक, प्राचार्य तसेच संस्थेचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य अश्मित पिल्लई, वर्ग शिक्षक कार्तिक कोकावार, मराठी विषय शिक्षक प्रफुल खोब्रागडे, हिंदी विषय शिक्षक अमित शिंदे, विद्यालयातील समन्वयिका सायमा शेख तसेच उपस्थित सर्व शिक्षकांना दिले.
विद्यालयातील या विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री झामसिंग येरणे, सचिव अनिल कुमार येरणे,कोषाध्यक्ष जयश्रीताई येरणे तसेच विद्यालयातील प्राचार्य अश्मित पिल्लई व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, शिवाजी संकुल चे सर्व पदाधिकारी तसेच देवरी येथील समस्त जनतेने केले आहे.





