अर्जुनी मोरगाव : ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या समस्यांचे निराकरण न झाल्यामुळे १६ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना डीएनए डीएनई १३६ तालुका शाखा अर्जुनी मोरगाव यांच्यावतीने असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे. गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या विविध महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत वारंवार चर्चा करून निवेदन देऊन मागण्या मार्गी लावण्यात आल्या नाहीत.
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र व राज्य सरकार यांच्या विविध लोकोपयोगी योजना विविध अभियान पाणीपुरवठा आरोग्य दिव्यांग कल्याण महिला व बालकल्याण मागासवर्गीयांची कामे दिवाबत्ती सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन अतिक्रमण, ग्रामपंचायत महिला सभा मासिक सभा, ग्रामसभा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत विषयी सूची वरील विविध कामे अभिलेखे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे विविध विकासात्मक बांधकामे व इतर विभागामार्फत येणारी कामे अगदी वेळेवर तात्काळ मागण्यात येणारी माहिती व अहवाल अशी विविध प्रकारची कामे ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाकडून पूर्ण केली जातात. मात्र, यापूर्वी ग्रामपंचायत अधिकारी तालुका संघटनेने १५ जुलै २०२५ तसेच २४ मार्च २०२६ ला अर्जुनी मोरगाव गटविकास अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देऊनसुद्धा समस्यांचे निराकरण करण्यात आले नाही. त्यामुळे टप्पेनिहाय असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे.
या आहेत संघटनेच्या प्रमुख मागण्या
२९ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत अधिकारी यांची वेतनश्रेणी निश्चित करण्यात यावी, कालबद्ध प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात यावे, जीपीएफ आणि एनपीएसची पावती देण्यात यावी, पतसंस्थेच्या कपाती वेळेत जमा कराव्या, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे किमान वेतन व राहणीमान भत्ताबाबत मार्गदर्शन करावे, वेतन शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला देण्यात यावे व इतर एकूण ३२ मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांची पूर्तता न झाल्याने १६ ते ३० एप्रिलपर्यंत पंचायत समितीच्या सर्व व्हॉट्स अॅपग्रुपमधून बाहेर होऊन पंचायत समितीच्या मासिक पाक्षिक व इतर सर्व सभांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. १ मेपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पवन कुमार पवार, उपाध्यक्ष व्ही. एम. पुणे, सचिव टी. टी. निमजे व सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.





