गोंदिया: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात सामाजिक समता कार्यक्रम उत्साहात व आदरपूर्वक साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन व संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य व डॉ.आंबेडकर यांच्या भारतीय राज्यघटनेतील अमूल्य योगदानाबाबत जनजागृती करणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पटले यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी त्यांच्या समता, न्याय आणि शिक्षण या विचारांचे स्मरण करून अभिवादन केले.
या प्रसंगी “संविधान जनजागृती कार्यक्रम : भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क” या विषयावर एन.एम.डी. महाविद्यालय, गोंदिया येथील विधी विभागाचे डॉ. उमेश उदापुरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच पंचायत समिती, गोरेगाव येथील गटविकास अधिकारी सौ. वैशाली खोबरागडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनतत्त्वांवर व्याख्यान दिले.या निमित्ताने संत गाडगेबाबा : जीवन व कार्य या विषयावर पोस्टर स्पर्धा,महाड सत्याग्रह व मानवाधिकार या विषयावर लघुनाट्य स्पर्धा,
महात्मा ज्योतिबा फुले : जीवन व कार्य या विषयावर निबंध स्पर्धा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा अशा विभिन्न विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बाबासाहेबांच्या समता, लोकशाही व मानवाधिकार या विचारांवर आधारित प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेमध्ये विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली.याप्रसंगी प्रा. डी. ए. चौहान, कु. अलका लांजेवार आणि कु. प्रतीक्षा वाहाने यांनी आपले विचार मांडून डॉ. आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे व समावेशक आणि प्रगत समाज निर्माण करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन व संचालन कार्यक्रम प्रभारी प्रा. डी. ए. चौहान, सांस्कृतिक प्रभारी डॉ. एस. बी. जुनेजा आणि डॉ. एस. पी. वर्मा यांनी संचालन तर आभार डॉ. एस. एस. जायसवाल यांनी केले.





