नागपूर : उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने १८ एप्रिल २०२६ रोजी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करत उष्णतेची लाट (हीट वेव्ह) येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नागपूर जिल्हा हद्दीतील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना शनिवार, १८ एप्रिल रोजी सुट्टी राहणार आहे.
सध्या जिल्ह्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहितीही देण्यात आली आहे.





