26.6 C
Gondiā
Tuesday, September 15, 2026
Home शैक्षणिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात ‘विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा व ऊर्जा संवर्धन’ जनजागृती...

शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात ‘विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा व ऊर्जा संवर्धन’ जनजागृती कार्यक्रम

0
7

अर्जुनी/मोरगाव ,दि. १५ सप्टेंबर २०२६:स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण), अर्जुनी/मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा व ऊर्जा संवर्धन” या विषयावर एक दिवसीय विशेष जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्य. प्राचार्य डॉ. भारत राठोड होते, तर प्रमुख अतिथी म्हणून महावितरणचे सहाय्यक अभियंता नंदकिशोर शहारे आणि श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे सहसचिव मयंक जायस्वाल उपस्थित होते. तसेच आयक्यूएसी (IQAC) समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत कापगते, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. एल. चौधरी, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. नितीन विलायतकर, कनिष्ठ अभियंता आशिष चेटूले आणि प्रा. पंकज उके यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन व पीपीटी सादरीकरण: कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. डी. एल. चौधरी यांनी विद्युत ऊर्जेचा सुरक्षित वापर आणि हरित ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख अतिथी नंदकिशोर शहारे यांनी पीपीटीच्या (PPT) माध्यमातून उपकरणांचा सुरक्षित वापर, अपघात रोखण्याचे उपाय, ऊर्जा बचत आणि सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी वीजेचा जबाबदारीने वापर करण्याचा आणि अनावश्यक ऊर्जा वापर टाळण्याचा संकल्प करत ‘विद्युत सुरक्षा व ऊर्जा संवर्धन’ शपथ घेतली. प्राचार्य डॉ. भारत राठोड यांनी आपल्या भाषणात ऊर्जा ही विकासाची गरज असून तिचा विवेकपूर्ण वापर ही सर्वांची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी हा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी लंजे यांनी तर आभार प्रदर्शन निर्भय बोरकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महावितरणचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.