29.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ पवनपुत्र नगरचा वीज प्रश्न कायमचा निकाली; महावितरणकडून नवीन रोहित्र कार्यान्वित

पवनपुत्र नगरचा वीज प्रश्न कायमचा निकाली; महावितरणकडून नवीन रोहित्र कार्यान्वित

0
64

नागपूरदि. 18 एप्रिल: प्रभाग क्रमांक 13 मधील पवनपुत्र नगर, गोधनी सिम आणि गारगोठी परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. उन्हाचा तडाखा वाढत असताना ‘फेज’ जाण्याचे प्रमाण वाढल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी होती. ही समस्या गांभीर्याने घेत महावितरणने या भागात नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसवून तो आज कार्यान्वित केला आहे, ज्यामुळे या भागातील विजेचा प्रश्न आता कायमचा सुटला आहे.

 या परिसरात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने जुन्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत होता, परिणामी वारंवार तांत्रिक बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत होता. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महावितरणने नवीन रोहित्र मंजूर करून त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. शनिवारी (दि. 18) हे नवीन रोहित्र प्रणालीशी जोडले गेल्याने विजेचा दाब (व्होल्टेज) स्थिर झाला असून नागरिकांना अखंडित वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 हे अवघड काम महावितरणच्या हुडकेशवर विभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. सहाय्यक अभियंता भारत पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहून कामाचे नियोजन केले. विशेषतः खरबी येथील तांत्रिक कर्मचारी रूपेश निखाडे आणि वैद्य यांनी भर उन्हात आणि तांत्रिक आव्हानांचा सामना करत हे काम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेले. या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळेच अतिशय कमी वेळात नवीन रोहित्र कार्यान्वित होऊ शकले.

परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. प्रभाग 13 च्या नगरसेविका मनीषा यादव यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, “नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. या नवीन रोहित्रांमुळे उन्हाळ्याच्या दिवसांत रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.” याबद्दल त्यांनी महावितरण कंपनीचे आणि संपूर्ण तांत्रिक चमूचे मनापासून आभार मानले आहेत.