जागतिक पुस्तक दिनानिमित्त विशेष उपक्रम
भंडारा : जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने २३ एप्रिलला सार्वजनिक वाचनालय भंडाऱ्याच्यावतीने ‘वाचू आनंदे’ या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी नूतन कन्या शाळेच्या १६३ विद्यार्थिनींनी या उपक्रमाचा लाभ घेतला
जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित ‘वाचू आनंदे’ या उपक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक वाचनालय भंडाराचे अध्यक्ष धनंजय दलाल यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सहकार्यवाह हर्षल मेश्राम,नीळकंठ रणदिवे, धनंजय ढगे, नितीन रासेगावकर,प्रा.नरेश आंबिलकर,डाॅ.गुरुप्रसाद पाखमोडे उपस्थित होते. या उपक्रमात सहभागी नूतन कन्या शाळा भंडाऱ्याच्या ग्रंथपाल दिपाली खापेकर,शिक्षिका धनश्री राऊत,कुंडलिक थाटे यांचा सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणातून धनंजय दलाल यांनी प्रत्येक शाळेसाठी सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने फिरते वाचनालय व पुस्तक पेढी या योजना सुरु करण्यात येत असल्याचे जाहिर केले.
या उपक्रमांतर्गत नूतन कन्या शाळेतील १६३ विद्यार्थिनींनी पुस्तक वाचनाचा आनंद घेतला.पुस्तक वाचना नंतर नियमित पुस्तक वाचनाचा संकल्प विद्याथिनींनी केला.
२ मे पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन घन:श्याम कानतोडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश साखरवाडे, दिनेश हरडे,सुधीर खोब्रागडे,युवराज साठवणे,मारोती वाघमारे यांनी परिश्रम घेतले.





