41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home रोजगार/व्यापार प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026 अंतर्गत;युवकासांठी रोजगाराच्या मोठ्या संधी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026 अंतर्गत;युवकासांठी रोजगाराच्या मोठ्या संधी

0
110

blank

गोंदिया, दि.25 : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी “प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026 अंतर्गत (PMIS) च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून, देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कॉर्पोरेट जगात कामाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांना नामांकित कंपन्यामध्ये कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करुन देणे हा आहे.

योजनेची ठळक वैशिष्टये आणि बदल : 12 एप्रिल 2026 पासूनच्या नवीन नियमानुसार या योजनेत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. वाढीव विद्यावेतन (Stipend) : निवड झालेल्या उमेदवारांना आता दरमहा 9,000/- रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. यापैकी काही हिस्सा कंपन्यांच्या माध्यमातून, तर उर्वरित रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) उमेदवाराच्या खात्यात जमा केली जाईल.

वयोमर्यादा : वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली असून, आता 18 ते 25 वर्षे वयोगटातील युवक प्रधानमंत्री इंटर्नशिप या योजनेसाठी पात्र असतील.

शैक्षणिक पात्रता : 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच आता पदव्युत्तर (Post Graduate) आणि MBA झालेले विद्यार्थीही अर्ज करु शकणार आहेत.

कालावधी : इंटर्नशिपचा कालावधी आता अधिक लवचिक करण्यात आला असून तो 6 ते 9 महिने इतका असेल.

आर्थिक मदत : रुजू झाल्यानंतर उमेदवाराला आकस्किम खर्चासाठी 6,000/- रुपये एकरकमी सानुग्रह अनुदान दिले जाईल.

नोंदणी कशी करावी : इच्छुक उमेदवारांनी सरकारच्या अधिकृत पोर्टल https://pminternship.mca.gov.in यावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी. एका उमेदवाराला जास्तीत जास्त 3वेगवेगळ्या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची मुभा आहे.

पात्रतेच्या अटी : उमेदवार सध्या पुर्णवेळ नोकरी करत नसावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी.

या योजनेद्वारे सेमीकंडक्टर, रिन्यूएबल एनर्जी आणि आयटी यासारख्या 20 पेक्षा जास्त क्षेत्रातील 300 हून अधिक आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजु माटे यांनी केले आहे.

अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी अथवा या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर संपर्क साधावा.