
पुणे :जिल्ह्याला यंदाच्या जीवघेण्या उन्हाळ्याचा पहिला मोठा आणि भीषण फटका बसला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी भर उन्हात शेतात राबणाऱ्या एका ४२ वर्षीय कष्टकरी महिलेचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून, अचानक चक्कर येऊन पडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत या महिलेने प्राण सोडल्याने संपूर्ण तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. निसर्गाच्या या प्रकोपापुढे गरिबांचा जीव किती हतबल असतो, हेच या घटनेने सुन्न करणाऱ्या पद्धतीने दाखवून दिले आहे.
रुपाली भाऊ गाडगे (वय ४२, रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) असे उष्माघाताने बळी गेलेल्या या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली या नेहमीप्रमाणे सकाळपासूनच शेतात खुरपणीचे काम करत होत्या. दुपारच्या सुमारास सूर्याचा कोप वाढला आणि उन्हाच्या तीव्र झळा अंगाला बसू लागल्या. अशातच रुपाली यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही समजण्याच्या आतच त्यांना भोवळ आली, त्यांचा रक्तदाब (BP) अत्यंत कमी झाला आणि त्या भर उन्हातच बेशुद्ध पडल्या.





