25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ झरपडा येथे जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीला आग;जीवितहानी टळली

झरपडा येथे जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीला आग;जीवितहानी टळली

0
93

अर्जुनी-मोर.दि.३०ः तालुक्यातील झरपडा येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. शाळेच्या एका वर्गखोलीत सरपण साठवून ठेवण्यात आले होते. प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अचानक लागलेल्या या आगीने काही क्षणातच विकराळ रूप धारण केले.
घटनेच्या वेळी शाळेत विद्यार्थी उपस्थित नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र आगीमुळे संबंधित वर्गखोलीतील शैक्षणिक साहित्य, फर्निचर, कागदपत्रे तसेच इतर साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.आगीची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत आपल्या खाजगी मोटर पंपांच्या सहाय्याने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शाळेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते गजानन डोंगरवार यांनी नुकसानग्रस्त वर्गखोलीच्या ठिकाणी तात्काळ नवीन वर्गखोली मंजूर करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच संबंधित घटनेची सखोल चौकशी करून आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचीही मागणी करण्यात आली आहे.