25.3 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home गुन्हेवार्ता अकोल्यात कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

अकोल्यात कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

0
117

अकोला : शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा ठोस कारवाई करत अकोल्यातील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात अटक केली आहे. जया पांडुरंग इंगोले (वय ४९, रा. महात्मा फुले नगर, मोठी उमरी, अकोला) असे अटकेत घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:२७ ते १२:०४ या कालावधीत पंचायत समिती अकोला येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने सन २०२४ मध्ये पूर्ण केलेल्या ११० मीटर सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे बिल काढून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २७ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली होती.

या तक्रारीची दखल घेत २८ एप्रिल रोजी शासकीय पंचांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. या तपासात जया इंगोले यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ३० एप्रिल रोजी सापळा लावण्यात आला आणि तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र) आणि अपर पोलीस अधीक्षक सतीन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या नेतृत्वात पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

blank