गडचिरोली : तालुक्यातील आमिर्झा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे आणि जनावरांच्या स्नानगृहाचे लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यातील हे पहिले जनावरांचे स्नानगृह आहे. सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी स्वतः गाईला स्नान घालून या सुविधेचे महत्त्व अधोरेखित केले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ना.जयस्वाल यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देत नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी उद्घाटने व विकास कामांचे लोकार्पण केले. आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण तसेच पर्यावरण संवर्धनाशी संबंधित उपक्रमांना यावेळी विशेष प्राधान्य देण्यात आले.
आमिर्झा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. याच ठिकाणी जिल्ह्यातील पहिल्या जनावरांच्या स्नानगृहाचे लोकार्पणही करण्यात आले. यावेळी ना.जयस्वाल यांनी स्वतः गाईला स्नान घातले.
मेंढा येथे आयुष्यमान भारत आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
इंजेवारी येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करून बालकांच्या पोषण व शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यानंतर देऊळगाव येथील मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत मोकळ्या जागेत ग्रामपंचायतीने लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या नर्सरीला भेट देऊन पाहणी केली. या नर्सरीमध्ये सुमारे 1000 आंबा व 700 शेवगा रोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासह उत्पन्नवाढीच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या दौऱ्यात सहपालकमंत्री यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आमदार रामदास मसराम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल काळभोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) दीपक बानाईत व इतर संबंधित अधिकारी तथा नागरिक उपस्थित होते.





